मुख्यमंत्र्यांनी स्वकीयांना धक्‍के देऊन धक्‍क्‍याला लावले

उमेदवारांच्या यादीतून दिग्गजांना डच्चू दिल्याने शिवेसेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले यात भाजपच्या याद्यांची चर्चा जास्त झाली. कारण भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या चार याद्यांमध्ये पक्षाच्या दिग्गज नेत्यांना डावलण्यात आले. याच भाजपच्या खेळीवर शिवसेनेने कडाडून टीका केली आहे. राजकारणाच्या या बाजाराला शिवसेनेने बिग बाझारची उपमा दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी बिग बाजारात फक्त कॉंग्रेस-राष्ट्रवादीलाच धक्के दिले असे नाही तर स्वकीयांनाही धक्के देऊन धक्‍क्‍याला लावले. महासंग्रामचा बिग बाजार झाल्यावर दुसरे काय होणार? अशा शब्दात शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

शुक्रवारी भाजपाच्या उमेदवारांची अखेरची यादी जाहीर झाली. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल अखेरचाही दिवस होता. भाजपाच्या उमेदवारांच्या यादीतून विद्यमान मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित, प्रकाश महेता यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. यावर शिवसेनेने आपल्याच मित्रपक्ष भाजपावर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झाला आहे. कुणी त्यास रणधुमाळीदेखील म्हणत असतात, पण जे सध्या चालले आहे तो संग्राम वगैरे नसून त्यास बिग बझारच म्हणावे लागेल. आमदारकीच्या खुर्च्यांसाठी अनेकांचे गाजेवाजे बंद झाले व चुपचाप सेलसाठी ते लोकशाहीच्या बिग बाजारमध्ये सध्या उभे राहिले आहेत. बिग बाजारात ज्याप्रमाणे विविध दुकाने व स्टॉल्स असतात तसे निवडणुकीत आता दिसू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बिग बाजारात फक्त कॉंग्रेस-राष्ट्रवादीलाच धक्के दिले असे नाही तर स्वकीयांनाही धक्के देऊन धक्‍क्‍याला लावले. महासंग्रामचा बिग बाजार झाल्यावर दुसरे काय होणार? असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

अग्रलेखातून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांचा स्टॉल या बिग बाजारमध्ये किमान पस्तीस वर्षे होता. यावेळी ते नाहीत. मुख्यमंत्र्यांना प्रत्येक पक्षांतर्गत विरोधक खडयासारखा बाजूला काढण्यात यश आले आहे. खडसे यांची वेदना समजून घेतली पाहिजे. 2014 साली महाराष्ट्रात युती तुटल्याची घोषणा करून शौर्यपदक छातीवर लटकवणारे हेच खडसे होते. 2019 मध्ये खडसे कोठेच नाहीत व त्यांना पूर्णपणे दूर केले गेले आहे. तर चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर- सांगलीच्या महापुरातून वाहत आले व त्यांचे गलबत पुण्यातील कोथरूड मतदारसंघाला लागले, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.