हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही झालेलीच नाही

सातारा  – साताऱ्यात नुकत्याच येऊन गेलेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेदरम्यान झालेल्या सभेत सातारा पालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सही केल्याची बातमी इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमधून पसरली. मात्र, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाकडे विचारणा केली असता, अशा प्रकारचे कोणतेही मंजुरीचे निर्देश आले नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, अशी माहिती शहर सुधार समिती व शहर परिसर समितीच्या सदस्यांनी दिली आहे.

याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, साताऱ्यात झालेल्या महाजनादेश यात्रेच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राजेंच्या आदेशाचे पालन करत मागण्या मान्य करणार, असे म्हटले होते. सातारा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करणार, अशी घोषणा केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीच्या प्रस्तावावर सही केल्याचे वृत्त काही इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमधून पसरले. असे कोणतेही मंजुरीचे निर्देश मंत्रालयातून आले नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाने केला आहे.

शहर सुधार व परिसर समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा करून याबाबत खातरजमा केली आहे. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आसपासच्या ग्रामपंचायती आणि परिसरातील नागरिकांनी हद्दवाढीला विरोध करताना हरकती घेतल्याची दखल घेतली आहे का? हद्दवाढीच्या विरोधात असलेल्या जनमताचे काय करणार, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे.

मुळात हद्दवाढीला विरोध होण्याची अनेक कारणे आहेत. सातारा पालिकेच्यावतीने सध्या शहरातील नागरिकांना अत्यंत दर्जाहीन सुविधा पुरवल्या जात आहेत. त्याचा त्रास शहर परिसरातील जनता सोसत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर पडलेले खड्डे वर्षानुवर्षे तसेच आहेत. सातारा पालिकेने वाढवलेली भरमसाठ घरपट्टी हे शहरवासीयांच्या रोषाचे कारण बनले आहे. अशा प्रकारे कोणत्याही दर्जेदार सुविधांशिवाय घरपट्टीनामक टोलची आकारणी आपल्यावर नको, म्हणून सध्या हद्दीबाहेर असलेल्या आणि प्रस्तावित हद्दवाढीत येणाऱ्या नागरिकांचा या हद्दवाढीला कडवा विरोध आहे.
हद्दवाढीऐवजी पिंपरी, निगडी व कोल्हापूरप्रमाणे शहर परिसराचे स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी शहर सुधार समिती व शहर परिसर समिती यांनी केली आहे, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या पत्रकावर विजय निकम व अस्लम तडसरकर यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)