Pimpri : पिंपळे गुरवमध्ये रोजच तुटताहेत चेंबरची झाकणे

सांगवी : पिंपळे गुरवमध्ये गेल्या आठवडाभरात पावसाळी वाहिन्यावरील चेंबर खचून तुटल्याच्या घटना घडत आहेत. करोडो रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्यावरील हे दृश्य कामाचा दर्जा उघड करत आहे. त्यामुळे तुटलेल्या सर्व चेंबरची दुरुस्ती करून पुन्हा चेंबर तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिंपळे गुरवमध्ये जवळपास सर्व भागात रस्त्याची कामे झाली आहेत. या कामापुर्वी ज्या पावसाळी वाहिन्या (स्टॉर्म वॉटर) टाकल्या आहेत, त्यावरील चेंबरची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे दिसत आहे. एकाच ठिकाणचे चेंबर वारंवार तुटत आहेत. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून दुरुस्ती केली. मात्र, पुन्हा हे चेंबर तुटत आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या या कामावर लोकप्रतिनिधी संताप व्यक्त करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे चेंबरची झाकणे मुख्य आणि वर्दळीच्या मार्गांवर तुटत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
आज सुदर्शननगर लेन नंबर दोन पेट्रोल पंपाच्या अ.िलकडे स्ट्रॉम वाॅटर लाइन चेंबर तुटल्याची तक्रार नागरिकांनी केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि पुन्हा एकदा सर्व चेंबरची पाहणी करून चेंबरची झाकणे बदलण्याच्या सूचना केल्या.
– राहुल जवळकर, सामाजिक कार्यकर्तेपिंपळे गुरव परिसरात विकासकामे झाली. रस्ते प्रशस्त झाले. पण पावसाळी वाहिन्यांची झाकणे तुटत आहेत, ही गंभीर गोष्ट आहे. सृष्टी चौक ते तुळजाभवानी मंदिर दरम्यानच्या रस्त्याची महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करून धोकादायक स्थितीतील चेंबरची झाकणे बदलणे गरजेचे आहे. अन्यथा चेंबरमध्ये अडकून नागरिकांना दुखापत होऊ शकते.
– अमरसिंह आदियाल, सामाजिक कार्यकर्तेकाटेपुरम चौक ते कृष्णा चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर असलेला चेंबर गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना व पादचारी नागरिकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक किरकोळ व मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाहणी करून चेंबरची तातडीने दुरुस्ती करावी.
-कैलास बनसोडे, कार्यकर्ते मानवाधिकार संघटना
मुख्य रस्त्यांवरील चेंबरची झाकणे तुटणे म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना अपघात घडू शकतो. यापूर्वीही कृष्णा चौक ते काटेपुरम चौकादरम्यान तुटलेल्या चेंबरमुळे अपघात घडले आहेत. विकासकामे होताना त्यांचा दर्जा राखणे आवश्यक होते. मात्र, दर्जा न सांभाळल्याने ऐन पावसाळ्यात चेंबर तुटत आहेत. महापालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजना करायला हव्यात.
– राजेंद्र जगताप, माजी नगरसेवकऐन पावसाळ्यात चेंबरची झाकणे तुटत असल्याने दुचाकीस्वारांना कसरत करीत गाडी चालवावी लागते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनाही पाय अडकून दुखापत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
– सुरेश सकट, सामाजिक कार्यकर्ते





