चिकाटीने पेलले एक लाख मोदक बनविण्याचे आव्हान!

फलटण -एक नाही दोन नाही, ना शंभर ना हजार, तर तब्बल एक लाख मोदक बनवण्याचे कठीण आव्हान फलटण येथील गीताई महिला बचत गटाच्या सदस्यांनी एकी, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 14 दिवसांत लीलया पेललं आहे. अष्टविनायकांपैकी मोरगाव येथील गणेश भक्ताच्या यज्ञासाठी एक लाख मोदकाचा मागणी या बचत गटाकडे आली. ती या बचतगटाने नुकतीच पूर्ण करून आपल्या कष्टाचे आणि एकीचे दर्शन घडवले. फलटण शहरातील बुधवार पेठेतील गीताई महिला बचत गटाची स्थापना 2009 मध्ये सौ. शिवानी संजय चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

आमच्यासाठी ही मोठी ऑर्डर होती. ती पूर्ण करणे आव्हान होते. परंतु, मोद म्हणजे आनंद. हा भाव मनाशी ठेवून एकमेकींना प्रोत्साहन देत ही ऑर्डर पूर्ण करण्याचा निश्चय केला. हा आमचा पाचवा प्रयत्न असल्याने कामाचा अनुभव पाठीशी होताच. श्रावणातील रेलचेल, मंगळागौरी आणि घरातील प्रापंचिक कामे करत सर्व महिलांनी प्रत्येकी 105 तासांचा वेळ दिल्याने हे आव्हान आम्ही पूर्ण करू शकलो. आगामी काळात यासोबत आणखी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे.
सौ. शिवानी चिटणीस,अध्यक्षा-गीताई महिला बचत गट, फलटण यात 17 सदस्य सहभागी झाल्या. तसा हा उच्चभ्रू कुटुंबातील महिलांचा बचतगट. या बचतगटाने सुरुवातीपासून गणपतीच्या पूजा साहित्याची विक्री करण्याचा मार्ग निवडला. तो वर्षभर चांगला चालवला. यातून त्यांना अल्पसा प्रतिसाद मिळाला असला तरी त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला. त्यांचा गणेशाप्रती असलेला प्रेमभाव यातून निदर्शनास येतो.
म्हणूनच का होईना दुसऱ्या वर्षी म्हणजे 2010 मध्ये त्यांना मोरगाव मंदिराचे पुजारी किशोर वाघ यांच्याकडून एक लाख मोदक बनवून देण्याची मागणी झाली. ही त्यांची पहिली संधी होती. अशा स्थितीत अध्यक्षा शिवानी चिटणीस आणि त्यांच्या सहकारी अंजली सहस्रबुद्धे, स्मिता केसकर, साक्षी कुलकर्णी, रेवती गोसावी, रजनी लांभोर, वंदना ढाले, वीणा वेलणकर, शुभांगी वादे, मानसी देशपांडे, रूपाली देशपांडे यांनी विचार केला.
तस त्यांच्यासाठी हे आव्हान कठीण होतं.परंतु, एकमेकींना प्रोत्साहन देत त्यांनी हे कठीण आव्हान स्वीकारायच ठरवलं आणि वाघ यांना होकार कळवला. किशोर वाघ यांच्याकडून मोदक बनवण्यासाठी लागणारे तेल, रवा, मैदा, साखर, भांडी आणि अन्य साहित्य मिळाले. त्याक्षणी या 17 महिला कामाला लागल्या. पहिल्याच दिवशी त्यांनी 5000 मोदक बनवले आणि त्यांना कामाचा आवाका आला. दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 7 पर्यंत कोणी मोदक लाटणे, कोणी मोदक भरणे, तर कोणी तळणे अशी कामे करू लागले. हे काम करत असताना या महिला अथर्वशीर्ष, विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्त यासारख्या स्त्रोत्रांचे पठण करत. मोदकाचे पावित्र्यही त्यांच्याकडून राखले जात होते. बघता बघता 14 दिवसांत अर्थात 1150 तासांत आणि प्रत्येकींने 105 तास काम करुन एक लाख मोदक पूर्ण केले. आणि आपल्या कष्टाचे व एकीचे दर्शन त्यांनी घडवले. यापूर्वी त्यांना 2011,12 आणि 13 अशी सलग चार वेळा संधी मिळत गेली. 2022 च्या श्रावणातील हा त्यांचा पाचवा प्रयत्न आहे. तोही त्यांनी वेळेत पूर्ण केला. हे कार्य सेवाभावी वृत्तीने करण्याचा त्यांचा मानस होता. तरीही मंदिर व्यवस्थापनाने त्यांना त्यांच्या कामाचा चांगला मोबदला दिला. त्यामुळे या महिलांना आर्थिक पाठबळ मिळत गेले.





