शिक्रापूर : थंडीचा कडाका वाढू लागल्याने जनावरांच्या व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक झाले आहे. या काळात योग्य देखभाल केल्यास जनावरांचे आरोग्य जपण्यासोबतच जास्तीचे उत्पादन मिळवणे शक्य आहे. जनावरांच्या निवाऱ्यासाठी गोठा आणि पोषणाचे योग्य व्यवस्थापन यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. आधुनिक गोठे हवेशीर असले तरी थंडीत गोठ्यात थेट शिरणाऱ्या वाऱ्यामुळे जनावरांना त्रास होतो. यासाठी गोठ्याला तात्पुरते पडदे लावावेत, मात्र अमोनिया वायू साचणार नाही याचीही दक्षता घ्यावी. जमिनीवरील ओलावा टाळण्यासाठी लहान वासरे व व्यायलेल्या गाईंच्या खाली वाळलेले गवत किंवा रबरी मॅट टाकावीत. हिवाळ्यात पाणी कमी मिळाल्यास जनावरांना बद्धकोष्ठता व अपचनाचे विकार होऊ शकतात, त्यामुळे मुबलक पाण्याची सोय असावी. तसेच जनावरांना धुण्याऐवजी खरारा केल्यास रक्ताभिसरण सुधारून थंडीपासून संरक्षण होते. स्वच्छता व निर्जंतुकीकरण महत्त्वाचे शेतकऱ्यांनी हिवाळ्यात गोठ्यात खेळती हवा ठेवत जनावरांची संख्या मर्यादित ठेवावी. जंत, कृमी व माशांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मलमूत्र व पाण्याचा योग्य निचरा करावा. गोठ्याची जमीन वेळोवेळी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करावी. तसेच जनावरांच्या खुरांची निगा राखून ते वाढले असल्यास कापून घ्यावेत, जेणेकरून पायांचे विकार टाळता येतील, असे मार्गदर्शन पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल येडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी काय करावे स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन पशुधनाचे रक्षण करण्यासाठी पूर्वतयारी ठेवावी. पत्र्याच्या छतावर वाळलेले गवत टाकावे, जेणेकरून ऊब टिकून राहील. कडाक्याची थंडी असल्यास गोठ्यात कृत्रिम प्रकाश व उष्णतेची सोय करावी. अशक्त व आजारी जनावरांना झाकण्यासाठी पोती वापरावीत. लहान वयाच्या व अशक्त पशुधनास पेंड व गूळ द्यावा, तसेच वेळेवर जंतनाशके द्यावीत. काय करू नये शेतकऱ्यांनी शीत लहरीच्या काळात पशुधनास उघड्यावर बांधू नये किंवा मोकाट सोडू नये. अशा काळात जनावरांच्या बाजारांचे किंवा मेळाव्यांचे आयोजन टाळावे. पशुधनास पिण्यासाठी अतिशय थंड पाणी देऊ नये. निवाऱ्याच्या ठिकाणी ओलसरपणा आणि धूर टाळावा. तसेच मृत पशुधनाचे शव कुरणावर अथवा चरावयाच्या मार्गात टाकू नये.