Pune District : श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नीरा स्नान
Pune District : सकाळी दहा वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी, गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरु होता.

परिंचे : श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे वैशाख वद्य सोमवती अमावास्येनिमित्त शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्रीनाथ म्हस्कोबा आणि देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना पवित्र नीरा नदी स्नान घालण्यात आले. यावेळी सर्व मानकरी, सालकरी, दागिणदार उपस्थित होते. सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पहाटे साडेचार वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट आणि भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी दहा वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी, गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरु होता.
साडेअकरा वाजता धुपारती होऊन देवांचे मुखवटे व पादुका पालखीत ठेवून ढोल, ताशा, निशाण, छत्री, अब्दागिरी या लवाजम्यासह वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्या नीरा स्नानासाठी मार्गस्थ झाल्या. नीरा नदीकाठी असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबांचे मुख्य ठिकाण घोडे उड्डाण येथील मंदिरास एक प्रदक्षिणा घेऊन श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नीरा नदी स्नान घालण्यात आले.
पालखी मार्गावर देवस्थानमार्फत भाविकांसाठी पिण्याचे पाणी, अनवाणी चालणाऱ्या भाविकांच्या मार्गावर पाण्याचा शिडकावा करणे यासाठी टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दुपारी विधीवत नीरास्नान होऊन श्रीनाथांची पालखी सर्व लवाजम्यासह सायंकाळी देऊळवाड्यात परतली.
शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप
सोमवती अमावस्येनिमित्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, लाईट- जनरेटर, दर्शनबारी, वाहनतळ व्यवस्था, परिसरात स्वच्छता, जादा कर्मचारी- स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलीस यांची नियुक्ती करण्यात आली होती. अशी माहिती देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली. तसेच दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांना प्रभाकर मोरे, तात्या बुरुंगले, राउत, वाघमोडे, सुनील धुमाळ, संकेत जगताप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, असे मुख्य विश्वस्त मोहन रावसो धुमाळ यांनी सांगितले. यावेळी विश्वस्त मंडळ, सहकारी, सल्लागार मंडळ उपस्थित होते.





