चाचण्यांची संख्या वाढविण्याचे आदेश
पुणे – पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. डिसेंबर, जानेवारीमध्ये काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढू शकते, त्यामुळे त्यादृष्टीने वॉच ठेवा, असे केंद्रीय पथकाने महापालिकेला ठणकावले आहे.
पुण्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले आहे. केंद्रीय पथकाने शहरातील प्रतिबंधित भागाची (कन्टेन्मेंट झोन) पाहणी केली. यानंतर शहरातील करोना परिस्थितीचा आढावा महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला.
प्रतिबंधित क्षेत्रातील करोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविण्यात याव्यात, अशा सूचनाही केंद्रीय पथकाने महापालिकेला केल्याची माहिती देण्यात आली. शहरामध्ये रुग्णांना बेड कमी पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
करोना झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये अन्य समस्या निर्माण होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे करोना उपचारानंतर, हृदयरोग, मानसिक आजार, पक्षघात यांसारख्या रोगांचा उपचारासाठी सुध्दा व्यवस्था करण्याचा सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.