नागठाणे -पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव मारुती स्विफ्ट कारने वळसे (ता. सातारा) गावच्या हद्दीत वळणावरील उड्डाणपुलावर पुढे निघालेल्या तीन मोटारसायकलींना पाठीमागून जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक राजेंद्र हणमंत घाडगे (वय 50, रा. समर्थनगर, ता. सातारा) हे महामार्गावरून अक्षरश: चेंडूसारखे उडून 25 ते 30 फूट खाली सेवा रस्त्यावर पडले. त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला तर अन्य दोन मोटारसायकलींवरील अमर शिवाजी पानस्कर (वय 32, रा. मल्हारपेठ, ता. पाटण) व कुमार माणिक पोतदार (वय 36, रा. सासपडे, ता. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मारुती स्विफ्ट कार (क्र. एमएच-11-एडब्ल्यू-302) शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास कराडकडून साताऱ्याकडे भरधाव निघाली होती. वळसे गावच्या हद्दीत उड्डाणपुलावर कार आली असता, पुढे असलेल्या तीन मोटारसायकलींना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, एका मोटारसायकलवर असलेले आरोग्य सहाय्यक राजेंद्र घाडगे हे अक्षरशः चेंडूसारखे (पान 7 वर)
हवेत उडाले आणि 25 ते 30 फूट खाली असलेल्या सेवा रस्त्यावर जोरात आपटले.त्यांनी डोक्यावर घातलेले हेल्मेट आधीच पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अन्य दोन मोटारसायकलींवरील अमर पानस्कर व कुमार पोतदार हेदेखील गंभीर जखमी झाले. सातारा बाजूकडे निघालेल्या कारचे तोंड अपघातानंतर पुन्हा कराड बाजूकडे झाले होते तर एका मोटारसायकलीचा अक्षरशः चुराडा झाला होता. अपघात झाल्याचे दिसताच परिसरातील ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली. त्यांनी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाकडे तातडीने पाठवले. मात्र, उपचारापूर्वीच राजेंद्र घाडगे यांचा मृत्यू झाला होता.
अन्य दोघांवर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारचालक अविनाश बाळकृष्ण पाटील (रा. कार्वे नाका, कराड) कार घटनास्थळी सोडून पळून गेला होता. या अपघातामुळे महामार्गावरील एका लेनवरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. बोरगावच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, राहुल भोये,चालक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. थोड्या वेळाने कारचालक अविनाश पाटील हे स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले.
पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून सपोनि डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर सुर्वे तपास करत आहेत. दरम्यान, कारचा एका बाजूचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची चर्चा होती; परंतु त्याला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.