चिंबळी, – निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती शेतकर्यांना खरीप हंगामापासून सध्याच्या रब्बी हंगामातही अनुभवयास मिळत आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीनसह अन्य या पिकांचे नुकसान झाले तर आता हे संकट रब्बी हंगामातही कायम राहिलेले आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे रब्बी हंगामातील फुलोर्यात आलेल्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने वारंवार औषध फवारणी केली तरी रोगराई जात नसल्याने खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील बळीराजा व्यथिथ झाला असून खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्याचा शेतकर्यांचा मानस फोल ठरत आहे.
रब्बी हंगामातील पिकांना थंडी ही पोषक असते मात्र, गेल्या काहि दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने हे वातावरण पिकांना बाधित ठरत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात नेहमी बदल झालेला आहे. सकाळ-संध्याकाळ थंडी तर दिवसभर ऊन असे पोषक वातावरण असताना आता दिवसभर ढगाळ वातावरण आणि सकाळ-संध्याकाळ थंडीचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकर्यांच्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे. एकीकडे उत्पादनात घट होत असताना वाढत असलेला खर्च ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झाले तर आता ढगाळ वातावरणाचा धोका रब्बी हंगामातील पिकांवर कायम आहे.
हरभरा फुलोर्यात असतानाच तीन वेळी फवारण्या
यंदा रब्बी हंगामात खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील बळीराजाने हरभरा या पिकाचा पेरा केला आहे. उत्पादनाची सर्व मदार आता याच पिकावर आहे. हरभरा आता फुलोर्यात आला आहे. असे असताना शेतकर्यांना आतापर्यंत दोन ते तीन वेळा औषध फावरणी करावी लागलेली आहे. उत्पादन पदरी पडेपर्यंतच अधिकचा खर्च होतो पण वातावरणातील बदलामुळे उत्पादन मिळेलच असे नाही. यापूर्वी खरिपात जे झाले तीच स्थिती रब्बी हंगामाची होऊ नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.