कर्नाटकात प्रचार अंतिम टप्प्यात! मोदी विरुद्ध गांधी कुटुंब रंगला सामना

बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यास एकच दिवस उरला आहे. आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध गांधी कुटुंब असा सामना रंगल्याचे दिसून येत आहे. तसेच कॉंग्रेस, भाजपा आणि जेडीएसकडूनही विजयाचा दावा केला जात आहे.
अनेक राजकीय तसेच सामाजिक मुद्द्यांमुळे कर्नाटकांच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच कॉंग्रेस आणि भाजपाचे एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप या निवडणूकांमध्ये बघायला मिळत आहे.
कर्नाटकात सध्या दोन राजकीय मुद्दे दिसत आहेत. पहिला म्हणजे, भाजप सरकारवर 40 टक्के कमिशनचा कॉंग्रेसने केलेला आरोप आणि दुसरा म्हणजे पीएफआय व्यतिरिक्त बजरंग दलावर बंदी घालण्याच्या कॉंग्रेसच्या घोषणेवर भाजपकडून आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय बजरंग दलाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनीही कॉंग्रेसला चांगलेच सुनावले असल्याचे चित्र पाहायला मिळाले. निवडणुकीपूर्वी 6 मे रोजी कॉंग्रेसने आणखी एक मोठा हल्ला केला. कॉंग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला यांनी आरोप केला आहे की, चित्तापूर मतदारसंघातील भाजप उमेदवाराने कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या हत्येचा कट रचला होता. तसेच कर्नाटक निवडणुकीसाठी सोनिया गांधींनी चार वर्षानंतर पहिल्यांदाच प्रचारासाठी हजेरी लावली.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका 10 मे रोजी पार पडणार असून 13 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या 224 इतकी आहे. सत्तेत येणाऱ्या पक्षाकडे 113 आमदारांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे.





