शिरूर : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गणेशनगर परिसरात रविवारी (दि.४) शेतकरी गणपत बाळासाहेब तावरे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन लहान बछडे आढळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुरावलेल्या बछड्यांची व त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाने गणेशनगर परिसरात पिंजरा लावला. पिंजऱ्यात सोमवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास अंदाजे पाच वर्षे वयाची बिबट मादी जेरबंद झाली. वनविभागाने दुरावलेल्या बछड्यांची व त्यांच्या आईची भेट घडवून आणली. अखेर बछडे आईच्या कुशीत विसावल्याने उपस्थित नागरिकांनी व वन अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. रविवारी (दि.४) पहाटेच्या सुमारास बिबट मादी पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनरक्षक नारायण राठोड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड, रेस्क्यू टिमच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जेरबंद झालेल्या बिबट मादीसह दोन्ही बछड्यांना सुरक्षितपणे जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविल्याचे वनरक्षक नारायण राठोड यांनी सांगितले. बिबट मादी जेरबंद झाल्याने नागरिकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, परिसरात आणखी बिबटे असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. वनविभागाने गावठाणासह वाड्या-वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कवठे येमाई गावठाणासह परिसरातील वाड्या-वस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच उसाच्या शेतात बछडे आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली होती.