अबाऊट टर्न : भैरवी

“”झाले झाले कीर्तन शेवट गोड करा,” असं म्हणत भैरवी आळवण्याची वेळ समीप आली. उद्या मध्यरात्री भिंतींवरच्या कॅलेंडरचं जीवितकार्य समाप्त होईल आणि परवा सकाळी नवं कॅलेंडर भिंतीवर भाव खाऊ लागेल. जुनं कॅलेंडर रद्दीवाल्याकडे जाईल किंवा त्याचं पान-पान वेगळं होऊन, वह्या-पुस्तकाचं कव्हर बनून आपल्यासोबत राहण्याची धडपड करत राहील. वियोगाच्या वेदना कॅलेंडरलाही होत असतील का? असा प्रश्न पूर्वी प्रत्येक वर्षअखेरीस पडायचा.
मनात गलबल व्हायची. हल्ली तर असं वाटू लागलंय, की या वेदना कॅलेंडरलाच सर्वाधिक होत असतील. किती गोड, आंबट, तिखट, तुरट, कडवट गोष्टींची नोंद कॅलेंडरच्या प्रत्येक चौकोनात वर्षभरात झाली असेल! “”बाबा रे… यातून काही शिकलास का,” असा प्रश्न भिंतीवरून उतरणारं कॅलेंडर चौकटी-चौकटीतून आपल्याला विचारतंय, असा भास होतो. “”नव्या कॅलेंडरवरचं भविष्य वाचतोस; पण जुन्या कॅलेंडरवरचं “भूत’सुद्धा एकदा वाच… त्यातच तुझं भविष्य दडलंय,” असंही मावळतं कॅलेंडर सांगू पाहात असेल.
उच्चभ्रूंच्या भिंतींवर चकचकीत डिजिटल कॅलेंडरं आलीत. त्यामुळं नव्या कॅलेंडरचा रुबाब बघण्याचा आनंद त्यांना मिळत नाही, तसंच जुन्या कॅलेंडरची वेदनाही समजत नाही. पूर्वी ओळखीच्या दुकानदारांकडे, घाऊक व्यापाऱ्यांकडे, संस्थांकडे नववर्षाची कॅलेंडरं आणि डायऱ्या हक्कानं मागण्याचा रिवाज होता. पण आता डायरीसुद्धा खिशातल्या मोबाइलमध्येच आलीय; त्यामुळं नववर्षाच्या साक्षीनं संबंधितांकडे प्रेमाचा आग्रह धरण्याची संधीही आपण गमावलीय.
असो, मावळत्या वर्षात आपण काय कमावलं, काय गमावलं याचा हिशेब वर्षअखेरीस करण्याची परंपराही आपण मागं टाकलीय. कारण “थर्टीफर्स्ट’चं प्लॅनिंग त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आणि तितकंच वेळखाऊ ठरलंय. नव्या वर्षात आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय, हे पाहण्यासाठी राशीभविष्य जाणून घेण्याचा आटापिटा मात्र कायम आहे; किंबहुना त्यात सातत्यानं वाढच होताना दिसतीय आणि यू-ट्यूब आदी माध्यमं ही “वाढीव गरज’ पूर्ण करण्यास सक्षम आहेत. राजकीय क्षेत्रात मात्र बऱ्याच जणांना आपलं भविष्य समजेनासं झालं असावं. अर्थात, राजकारण्यांच्या दृष्टीनं 2023 पेक्षा 2024 जास्त महत्त्वाचं.
तथापि, 2024 साठीची पेरणी येत्या वर्षभरात करावी लागणारंय…शिवाय 2023 मध्येच काही वरखाली झालं तर.? कुणी सांगावं, होईलसुद्धा..! जन्मकुंडली, राशीभविष्य, फलज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड…सगळ्याच ब्रॅंचेसकडे राजकारण्यांची धावाधाव चाललीये. राजकारणातल्या अनेकांना मावळत्या वर्षाच्या कॅलेंडरनं भिंतीवरून उतरता-उतरता तंबी दिली असणारंय. पण जो जितका घाबरतो, तो तितका आक्रमक होतो या न्यायानं राजकारणी मंडळींनी वर्षाचा शेवट गोड करण्याची संधीही गमावली. म्हणूनच वर्षभरातला कडवटपणा अनेकांच्या खात्यावर “कॅरी फॉरवर्ड’ होईल, अशी चिन्हं आहेत. भैरवीच्या मधुर स्वरांचा आस्वाद घेणं राजकारण्यांच्या नशिबी नाही.
“”रे-ग-ध-नि कोमल राखत, मानत मध्यम वादी। प्रातः समय जाति संपूर्ण, सोहत सा संवादी।।” असं भैरवीचं स्वरूप असतं. चार स्वर कोमल असल्यामुळंही सांगता गोड होते. म्हणूनच “अवघा रंग एक झाला,’ किंवा “तू गंगा की मौज मैं जमुना का धारा’ अशी स्वत्व विसरून शेवट गोड करणारी गाणी भैरवीत बांधली गेली. पुढच्या वर्षीची नांदी कशी असेल आणि वर्षभर काय-काय गावं लागेल, कुणास ठाऊक! यावर्षीची भैरवी तरी गोड करूया!





