वाघोली (पुणे) – वाघोली (ता. हवेली) परिसरातील गावांमध्ये शुक्रवारी (दि. 29) वीजचोरी करणाऱ्या 25 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. वीज चोरी रोखण्यासाठी मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. यापुढेही कारवाई महावितरणाच्या नियमानुसार केली जाणार आहे, अशी माहिती वाघोली येथील सहायक अभियंता गणेश श्रीखंडे यांनी दिली.
महावितरणाच्या मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली शाखा येथे वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या पथकाद्वारे वाघोली, पेरणे भागामध्ये महावितरणाच्या नियामनुसार कडक कारवाई केली जाणार असल्याचेही श्रीखंडे यांनी सांगितले.
शुक्रवारी या पथकाने वाघोली, लोणीकंद, बकोरी, आव्हाळवाडी, पेरणे परिसरातील 25 ग्राहकांवर वीज चोरी केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता बाबरेकर व सहाय्यक अभियंता बाबर, सहायक अभियंता गणेश श्रीखंडे, सहाय्यक अभियंता अंकुश मोरे व विद्युत कर्मचारी उपस्थित होते.