वधू-वर सूचक एजंटांचा सुळसुळाट

सुभाष कदम
शिराळा – बोगस वधू- वर सूचक मंडळ तसेच काही वधू- वर सूचकच्या नावाखाली काम करणारे एजंट यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. वधू- वर पक्षांना लुटण्याचा धंदा जोरात चालू असून अशा समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालणे गरजेचे आहे. शिराळा येथील एका समाजातील तरूणाला व त्याच्या कुटुंबियांना याचा मोठा फटका बसल्याची घटना घडली आहे.

गेल्या काही वर्षांचा आढावा घेता वधूंची संख्या फार कमी आहे. कर्नाटकमधील वधू लग्न करून आणण्याचा एक वेगळाच प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी बोगस वधू-वर सूचक मंडळांचे पेव फुटले आहे. बोगस दलाली करुन पैसा मिळणाऱ्या एजंटांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

वधूंची संख्या कमी असल्यामुळे काही वर पक्ष वधू संशोधनाकरिता एजंटांमार्फत कर्नाटकमध्ये जातात व फसतात. असाच एक प्रकार शिराळा येथेही घडला आहे. बेळगावजवळील एका गावातील मुलीचे शिराळा येथील एका तरुणाबरोबर लग्न झाले. हे लग्नही अशाच पद्धतीने झाले आहे. लग्नाचा सर्व खर्च नेहमीप्रमाणे वर पक्षाने केला. मात्र वर पक्षाला लुटण्यासाठीचे एजंटांमार्फतचे हे नाटक होते, हे फार उशिरा लक्षात आले. शारीरिक व मानसिक छळाची केस दाखल करू, अशी धमकी देण्याचे प्रकार वधूच्या माहेरकडून सुरू झाले. कर्नाटकमधील पुरुष मंडळींनी व महिलांनी येऊन त्या तरुणाच्या घरात प्रचंड दंगा केला.

कोणतेही रजिस्ट्रेशन नसलेल्या महिला मंडळाच्या अध्यक्ष अथवा महिलांना मदतीला घेऊन बरेच प्रकार घडवून आणले. प्रकरण मिटवण्यासाठी काही लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यामध्ये पोलिसांनाही मध्यस्थी म्हणून घेण्यात आले होते. काही लाख रुपये द्या व घटस्फोट घ्या, असा प्रस्ताव समोरून आल्यामुळे शिराळ्यातील तरुणाचे मात्र धाबे दणाणले. कारण या तरुण व त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल सुद्धा घेतली नव्हती. नंतर तरूणाने कुटुंबियांबरोबर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील कारवाईचे आदेश दिले. परंतु, पुढे नेहमीप्रमाणेच कोर्टकचेऱ्याच्या फेऱ्या सुरू झाल्या. त्यामुळे या तरुणाचे व त्याच्या कुटुंबीयांचे मात्र अत्यंत हाल झाले. सध्या सर्वत्र अशा लग्न जमविणाऱ्या एजंटांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सामाजिक परिस्थिती गंभीर झाली आहे.

शासकीय यंत्रणेने पावले उचलणे आवश्‍यक
लग्न जमविण्याचा धंदा करणाऱ्या एजंटांमध्ये पुरुष व महिलांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांची कोणतीही नोंद नाही अथवा कोणतीही त्यांना कायदेशीर मान्यता नाही. दोन्ही पक्षांकडून म्हणजेच वर पक्षाकडून वधू पक्षाकडून अक्षरशः लाखांनी रकमा उकळण्यात येतात. गरजेपोटी लोक त्यांच्या मागणीप्रमाणे पैसा पुरविण्याचा उद्योग करतात. तुमचे लग्न जमवून देतो, असे म्हणून फसविण्याचे प्रकार सुरू आहेत.

अशा व्यवहारांना कोणतीही कायदेशीर मान्यता नाही, परंतु, या महत्त्वाच्या बाबींकडे शासनाचे व शासकीय प्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत शासकीय यंत्रणेने महत्त्वाची पावले उचलणे अत्यंत आवश्‍यक आहे. अशा रजिस्टर्ड संस्था, एजंट अथवा महिला एजंट यांच्यावर रीतसर कारवाई करून अशा प्रकारांना पूर्णपणे आळा घालणे अत्यंत गरजेचे झाले आहे. कारण हा एक सामाजिक परंतु अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न असून याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.