माणुसकीचा सेतू मजबूत

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सध्या पुणे जिल्ह्यांमधून मदतीचा ओघ सुरू आहे. हाच ओघ दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे लोकांमध्ये सामाजिक जाणीवेबरोबर मदतीची जागृती देखील निर्माण झाली आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी तसेच विविध तरुण मंडळे, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, दवाखाने, पतसंस्था, बॅंका यांच्यामार्फत जमेल तेवढी वस्तूरुपाने मदत करण्यात येत आहे. त्याचे प्रमाण वाढू लागले आहे. हवेली तालुक्‍यातून सातारा, सांगली, कोल्हापूरकडे रोज ये – जा करणाऱ्या नागरिकांना आता आपल्या जवळच्या भागातील नागरिकांवर आलेल्या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्याची नवी उमेद आली आहे. त्यांची मदतीची भावना सध्या वाढीस लागली आहे.

हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर, वाघोली, केसनंद, खेड- शिवापूर, आव्हाळवाडी, उरुळी कांचन, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगावमूळ, शिरसवडी, लोणीकंद, वाडेबोल्हाई, अष्टापूर, हिंगणगाव, शिंदेवाडी, भवरापूर, पिंपरी सांड्‌स, न्हावी सांडस, बकोरी, भावडी, पेरणे, तुळापूर आदी गावांतून रोख रकमेसह वस्तू रूपाने मदत केली जात आहे. ही मदत पुन्हा विभागीय कार्यालय तसेच काही लोकप्रतिनिधीमार्फत प्रत्यक्ष पूरग्रस्त बांधवांनी भेटी देऊन त्यांना दिली जात आहे. शासनाच्या वतीने दिली जाणारी मदत आणि सामाजिक जाणिवेतून होत असलेली मदत पूरग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत तातडीने पोहोचत आहेत, याचे एकीकडे समाधान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.