शिक्रापूर येथे मोरे परिवाराचा अनोखा उपक्रम
शिक्रापूर- सध्या लग्नांची धामधूम सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी वधू- वर लग्नाला जाताना वराची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू आहे, तर वधूकडील नातेवाईक मुलगी लग्न होऊन सासरी जाणार असल्यामुळे थोडेसे नाराज असतात. परंतु शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मोरे परिवाराने लग्नाला जाताना नवरी मुलीची घोड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढून समाजाला मुलींबाबत अनोखा संदेश दिला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील गोरक्ष मोरे व जिजाबाई मोरे यांच्या माधुरी हिचा विवाह दौंड तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी विकास जाधव यांच्यासोबत होत असताना विवाह समारंभ शिक्रापूर येथील मंगल कार्यालयात होता.
माधुरी ही सर्वांच्या आणि विशेषत: आजी मंगल सोनवणे यांची लाडकी होती. त्यामुळे माधुरीच्या लग्नात काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. माधुरीला विवाहास्थळी घेऊन जात असताना मोरे परिवाराने त्यांच्या करंजेनगर येथील घरापासून गावापर्यंत माधुरीची घोड्यावरून मिरवणूक काढून मुलीचे स्वागत केले आहे. यावेळी अनेक मुली देखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना आम्हाला मुले- मुली सर्व सारखेच असून सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. आम्ही कष्ट करत असताना देखील माधुरीने चांगले शिक्षण घेत आमच्या परिवाराचे नाव उंचावले आहे. त्यामुळे माधुरीचा आम्हाला अभिमान असून मुलींना आम्ही मुलांप्रमाणे वागणूक दिल्याचे माधुरीच्या आजी मंगल रघुनाथ सोनवणे यांनी सांगितले.