Pimpri : गुदमरतोय झाडांचा श्वास!

चिखली : निसर्गाचं सौंदर्य वाढवण्यासाठी स्पाइन रोडवर रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडं आता स्वतःच्या वाढीसाठी संघर्ष करत आहेत. पिंपळ, गुलमोहर सारख्या वृक्षांची खोडं लोखंडी संरक्षक पट्ट्यांमध्ये अडकली असून त्यांचा श्वास गुदमरतोय, अशी व्यथा आता वृक्षप्रेमींनी मांडायला सुरुवात केली आहे.
स्पाईन रस्ता नव्याने उभारला गेला, तेव्हा सुशोभिकरणासाठी दोन्ही बाजूंना लोखंडी संरक्षक पट्ट्यांमध्ये झाडे लावण्यात आली होती. त्या वेळी ही रोपं लहान होती, मात्र काळानुरूप वाढ झाल्याने आता या वृक्षांची खोडं जाळ्यांमध्ये अडकून गेलेली दिसतात. खोडं वाढत असून त्यावर लोखंडी पट्ट्यांचा दडपण निर्माण होत आहे. काही झाडांची फांदी तुटल्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यात झाडांची अशी पडझड अधिकच धोकादायक ठरू शकते.
वाहनधारक आणि झाडे दोघेही संकटात
या झाडांच्या आजूबाजूच्या पट्ट्या आता मोडकळीस आल्या आहेत. स्पाइन रोड पोलीस चौकीजवळ आणि अन्य काही भागांत या संरक्षक पट्ट्या वाकलेल्या, तुटलेल्या स्थितीत आहेत. अशा ठिकाणी जर एखादं वाहन जाळ्यांना धडकलं, तर वाहनाला नुकसान तर होईलच, पण झाडांचेही प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. नुकताच एका लिंबाच्या झाडाचा संपूर्ण वरचा भाग मोडून फक्त खोडच उरले होते. यावरून समस्या किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो.
वृक्षप्रेमींची मागणी
महापालिकेने झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी फक्त वृक्षारोपण केल्यावरच नव्हे, तर त्यांच्या वाढीच्या टप्प्यावरही घेतली पाहिजे. अनावश्यक फांद्या वेळेवर छाटल्या गेल्या पाहिजेत, संरक्षक जाळ्यांचे देखभाल-दुरुस्ती वेळोवेळी झाली पाहिजे. लोखंडी जाळ्यांमध्ये अडकून झाडांच्या वाढीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याची आज नितांत गरज आहे.
झाडांची योग्य निगा हवी
वृक्ष हे केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नसून पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आवश्यक घटक आहेत. त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास आपण केवळ निसर्गाशीच नव्हे तर स्वतःच्या भविष्याशीही खेळ करत आहोत, याची जाणीव ठेवावी लागेल. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने त्यांची योग्य निगा राखणे गरजेचे आहे.





