केजुदेवी बंधाऱ्याचे तळदरवाजे पावसाळ्यात उघडे ठेवणार

प्रशासनाचा दावा : पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होणार
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराला केजुदेवी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी या बंधाऱ्याचे दरवाजे पावसाळ्यात बंद ठेवले जात होते. त्यामुळे बंधाऱ्यात मागे पाणी साचून फुगवटा तयार होत होता. तसेच बंधाऱ्यावरून पाणी उलटून जास्त प्रवाहाने पुढे जात होते. त्यामुळे बंधाऱ्याच्या मागील बाजूस व पुढेही पूराचा धोका कायम राहत होता. यंदा बंधाऱ्याच्या तळातील दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूराची तीव्रता कमी होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
महापालिका आयुक्तश्रावण हर्डीकर यांनी पावसाळापूर्व नालेसफाईची पाहणी केली. त्यामध्ये पवना नदीवरील केजूदेवी बंधारा व पेपरमिलच्या बंधाऱ्याची पाहणी केली. त्यावेळी बंधाऱ्याच्या तळातील दरवाजे उघडे ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या आहेत. हे दरवाजे उघडे ठेवल्याने धरणांधून येणारे पाणी बंधाऱ्यात साचून न राहता नदीपात्रातून वाहून जाणार आहे.
जास्त पाऊस पडल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडले तरी केजूदेवी बंधाऱ्यात पाणी जास्त साचून राहणार नाही. त्यामुळे बंधाऱ्याच्या मागील बाजूस पाण्याचा फुगवठा तयार होणार नाही. तसेच बंधाऱ्यावरून पाणी न जाता ते दरवाज्यांमधून वाहून जाईल. त्यामुळे पूराची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.





