नागपूर – नागपूरमध्ये तरुणाची निघृणपणे हत्या करुन दूचाकीसह त्याचा मृतदेह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पंकज गिरमकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तपास केला असता त्यांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज गिरमकर हा कापसी येथील एका कंपनीत टेक्निशियन पदावर कार्यरत होता. त्यामुळे तो पत्नी आणि मुलासह कापसी परिसरातच भाड्याच्या घरात राहात होता. मात्र 29 डिसेंबरपासून तो बेपत्ता होता. दोन दिवस पंकजसोबत संपर्क होऊ न शकल्यामुळे त्याच्या बहिणीने नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पंकजच्या नातेवाईकांनी पोलिसांना काही संशयितांची नावे दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आणि धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. या माहितीमुळे नागपूरच्या भंडारा मार्गावरील कापसी येथे 12 फूट खड्ड्यात पंकज गिरमकरचा मृतदेह सापडला. यावेळी त्याची दूचाकीदेखील खड्ड्यात आढळली.