पुणे जिल्हा | पूरात वाहून गेलेल्याचा मृतदेह मिळाला

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – गुळाणी येथे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 4) घडली. सागर लहाणू घेर वय 35 रा. धामारी, ता. शिरूर असे पुरात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
धामारी (ता. शिरूर) येथील सागर घेर व त्यांचा मित्र सोमनाथ मोरे हे रविवारीगार्यी पाहण्यासाठी गुळाणी येथे आले होते. त्यावेळी खेड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत होते. यावेळी गुळाणी येथील ओढ्याला पूर आला होता.
सागर घेर दुचाकी वरून घरी परतत असताना गुळाणी पाझर तलावालगत असलेल्या ओढ्यावरील पूल ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. दुचाकी थांबली आणि पुरात पडली. दरम्यान खिशातील मोबाइल पाण्यात पडला. पाण्यात पडलेला मोबाइल शोधण्यासाठी सागर घेर प्रयत्न करत असताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहून गेले. त्यांचा मित्र मात्र थोडक्यात बचावला.
राष्ट्रवादीचे खेड तालुका पुर्व विभागचे अध्यक्ष चेतन पिंगळे यांनी घटनाक्रम खेड पोलिसांना कळवला. पोलीस व ग्रामस्थांनी सागरला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र पाणी जास्त असल्यामुळे तो मिळून आला नाही. दुसर्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. 5) एक किलोमीटर अंतरावर ओढ्यातील झाडाझुडपात सागर घेरचा मृतदेह मिळून आला.





