प्रभात वृत्तसेवा पुणे – नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून चुलत भावावर चाकूने वार करून खून करण्यात आला. खुनानंतर भावाचा मृतदेह कात्रज घाटातील डोंगरात टाकला असून याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अशोक पंडित (३५, रा. मोशी, मूळ रा. झारखंड) याला अटक केली.अजय पंडित (२३, रा. खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. झारखंड) यांचा खून झाला असून अजय आणि अशोक चुलत भाऊ असून दोघे मूळचे झारखंडचे आहेत. मागील चार वर्षांपासून ते पुण्यात मजुरी करतात. अजय हा कात्रजमधील खोपडेनगर भागात नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहत होता. चुलतभाऊ अशोक हा मोशीत राहायला आहे. अजय अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार आल्याने पोलिसांचा संशय बळावला. बेपत्ता होण्यामागचे कारण समजत नव्हते.पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले तेव्हा संशयावरून अशोकला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खून केल्याची कबुली दिली. अजयचा खून केल्यानंतर मृतदेह कात्रजमधील गुजरवाडी भागात टाकला. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला. मृतदेह ससूनमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या पथकाने कामगिरी केली