धक्कादायक ! घाटकोपर येथील महिलेचा मृतदेह थेट हाजीअलीत

मुंबई – घाटकोपर येथे एक महिला गटारीत पडल्याची दुर्घटना घडली होती. यानंतर या महिलेचा मृतदेह थेट हाजीअली समुद्रकिनारी आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपासातही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या असल्फा भागातून पर्जन्य जलवाहिनीतून शितल भानुशाली ही 32 वर्षीय महिला वाहून गेली होती. तिचा मृतदेह आज पहाटेच्या सुमारास हाजीअलीच्या समुद्र किनारी सापडला. असल्फा ते हाजीअली हे अंतर सुमारे 20 ते 22 किमीचे आहे. यामुळे नाल्यातून मृतदेह ऐवढ्या लांब कसा वाहत गेला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तब्बल 20 ते 22 किमीचा प्रवास करून हाजीअलीच्या समुद्र किनारी महिलेचा मृतदेह मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून काही धागेदोरे मिळतायेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
तसेच या प्रकरणाची मुंबई महापालिका चौकशी करणार असून उपायुक्तांना 15 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिले आहेत.
दरम्यान, महापालिकेने पर्जन्य जलवाहिन्या, गटारातून वाहणाऱ्या पाण्यातील कचरा अडवण्यासाठी जागोजागी मोठमोठ्या जाळ्या आणि ग्रील्स बसविल्या आहेत. त्यामुळे महिलेचा मृतदेह वाहून जाऊच शकत नाही, असे पालिकेने म्हटले आहे.





