पुणे – आपल्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे तरुण वर्ग आणि माता-भगिनींमध्ये देवाभाऊ म्हणून लोकप्रिय असलेले देवेंद्र फडणवीस जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे ठाम प्रतिपादन भारतीय जनता पक्षाने केले आहे. केवळ ही योजनाच नव्हे तर महिला सबलीकरणाच्या केंद्र, राज्याच्या सर्व योजना सर्वशक्तीनिशी राबवल्या जातील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारी लाडकी बहीण योजना, महिलांचा विश्वास जिंकण्यात कमालीची यशस्वी ठरली. विधानसभा निवडणुकीत विरोधकांना भुईसपाट करण्यात या योजनेचा लक्षणीय वाटा राहिला. त्यामुळे बिथरलेले विरोधी पक्ष निवडणुकीच्या तोंडावर ही योजना बंद होणार असल्याचा अपप्रचार करतात. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही विरोधी पक्षांनी भाजप सरकार ही योजना बंद करू शकते, असा अपप्रचार करत लाडक्या बहिणींना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा तोच अपप्रचार सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने खुलासा केला आहे. ज्या कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. अल्प उत्पन्न गटातील महिलांना यामुळे मोठा आधार प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होत असल्याने घरबसल्या योजनेचा लाभ मिळतो. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज पडत नाही. संक्रातीपूर्वी साडेचार हजार रुपये? पुण्यातील लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबर, डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या तीन महिन्यांचे एकत्रित साडेचार हजार रुपये येत्या मकरसंक्रांतीपूर्वी म्हणजेच 14 जानेवारीपूर्वी जमा होण्याची चिन्हे आहेत. याबाबत यंत्रणेला तसे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, कमी उत्पन्न गटातील जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी, ई-केवायसी अनिवार्य केले आहे. येत्या 31 डिसेंबर पूर्वी ई-केवायसी करावी लागणार आहे. मात्र, यालाही मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.