पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या (१५ जानेवारी २०२६) तोंडावर राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) जोरदार प्रत्युत्तर देत २० हून अधिक ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवकांना पक्षात सामावून घेतले. यात अजित पवार गटातील १२ नेते, उद्धव ठाकरे गटातील नेते आणि इतर पक्षांचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला, ज्यात भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची प्रमुख भूमिका होती. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाजपच्या काही माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतले होते. त्याला उत्तर देताना लांडगे यांनी म्हटले, “अजित पवारांनी छोटे फटाके फोडले होते, आम्ही त्यापेक्षा मोठे फोडले. पिंपरीत अजित पवारांना आणखी धक्के देणार आहोत. महायुतीत कोणतीही कटुता येणार नाही, भाजपची नाराजी दूर होईल.” लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे प्रवेश घडल्याचे सांगितले. भाजपात प्रवेश केलेले प्रमुख नेते – संजोग वाघेरे (शहराध्यक्ष, ठाकरे गट; माजी महापौरांचा मुलगा कुशाग्र कदम यांच्यासह) – उषा वाघेरे (माजी स्थायी समिती अध्यक्षा, अजित पवार गट) – प्रभाकर वाघेरे (माजी उपमहापौर, अजित पवार गट) – राजू मिसाळ (माजी उपमहापौर, अजित पवार गट) – प्रशांत शितोळे (माजी स्थायी समिती अध्यक्ष, अजित पवार गट) – नवनाथ जगताप (माजी स्थायी समिती अध्यक्ष, शरद पवार गट) – रवी लांडगे (भाजपचे माजी नगरसेवक, ठाकरे गटातून परत) – अमित गावडे, मीनल यादव (ठाकरे गट) – विनोद नढे, प्रसाद शेट्टी, समीर मासुळकर, जालिंदर शिंदे (अजित पवार गट) – संजय काटे (माजी अपक्ष) या प्रवेशामुळे महाविकास आघाडी आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते म्हणतात, शहराच्या विकासासाठी हे नेते महत्त्वाची भूमिका बजावतील आणि पक्षाला निर्णायक विजय मिळेल. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गट स्वबळावर लढत असून, ही लढत ‘पिंपरीचा दादा विरुद्ध बारामतीचा दादा’ अशी झाली आहे. निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता असून, भाजपची ताकद वाढल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आचारसंहिता लागू असतानाही पक्षांतराला वेग आला आहे.