नवी दिल्ली : ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना प्रयागराज येथे स्नानासाठी जाण्यापासून रोखल्याच्या घटनेवरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली. भाजपला केवळ सत्ता आणि पैशाचा हव्यास असून त्यांना धर्म किंवा श्रद्धेशी काहीही देणेघेणे नाही, असा आरोप करत काँग्रेसने ‘ये ना काम के हैं, ना राम के हैं’ अशा शब्दांत भाजपचा समाचार घेतला. या घटनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही पक्षाने केली आहे. प्रयागराज येथील माघ मेळ्यादरम्यान रविवारी मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर शंकराचार्य आपल्या सुमारे २५० अनुयायांसह संगमावर स्नानासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि पूर्वपरवानगी नसल्यामुळे त्यांना रोखण्यात आले. मात्र, या घटनेनंतर शंकराचार्यांनी अन्नत्याग करून उपोषण सुरू केल्याने राजकारण तापले आहे. काँग्रेसचे माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. खेरा म्हणाले की, शंकराचार्यांसारख्या महनीय संताला अशा प्रकारे वागणूक मिळणे अत्यंत क्लेशदायक आहे. हे सरकार धर्माचा केवळ राजकीय वापर करते, पण प्रत्यक्षात संतांचा आदर राखण्यात अपयशी ठरले आहे. जो कोणी सत्तेसमोर झुकत नाही, त्याच्या विरोधात सरकार आपली सोशल मीडिया यंत्रणा (ट्रोल आर्मी) सक्रिय करते, असा आरोपही त्यांनी केला. खेडा यांनी पुढे म्हटले की, संतांनी राजासमोर झुकायचे नसते, तर राजाने संतांसमोर नतमस्तक व्हायचे असते. शंकराचार्यांचा गुन्हा इतकाच आहे की ते सरकारची स्तुती करत नाहीत. त्यांनी अर्धवट बांधलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यास विरोध केला, महाकुंभातील गैरव्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि कोरोना काळात गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांच्या मुद्द्यावर सरकारला आरसा दाखवला. जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याला लक्ष्य केले जाते, असे खेडा म्हणाले.ज्या सरकारकडून मोहन भागवत यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते, तेच सरकार शंकराचार्यांना शाही स्नान करण्यापासून रोखते, ही बाब संतापजनक असल्याचे खेरा म्हणाले.