छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षशिस्त मोडणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पक्षविरोधी कारवाया, बंडखोरी आणि शिस्तभंग केल्याच्या आरोपावरून भाजपने तब्बल 22 जणांना पक्षातून काढून टाकले आहे. महापालिका निवडणुकीत काही भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेला धक्का देत इतर पक्षांकडून उमेदवारी स्वीकारली, तर काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. याशिवाय पक्षाच्या निर्णयाविरोधात वक्तव्ये केल्याचा ठपकाही संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. भाजपच्या नियमांचे आणि पक्षशिस्तीचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. त्यानुसार बंडखोरी करणारे, अपक्ष उमेदवारी अर्ज न मागे घेणारे तसेच पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले की, “सुरुवातीला शंभर ते सव्वाशे जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेऊन समजावून सांगितल्यानंतर बहुतांश जणांनी अर्ज मागे घेतले. मात्र, यामधील 22 जणांनी अर्ज मागे न घेता इतर पक्षांकडून उमेदवारी स्वीकारली आणि बाहेर असा चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला की पक्षानेच त्यांना उमेदवारी दिली आहे.” पुढे बोलताना शितोळे म्हणाले, “आम्ही शेवटपर्यंत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि भविष्यात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, असेही सांगितले. मात्र, तरीही त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने आमच्यासमोर कारवाईशिवाय पर्याय नव्हता.” या कारवाईनंतर संबंधित 22 जणांचे भाजपशी कोणतेही संबंध राहणार नाहीत, असे स्पष्ट करत भविष्यातही पक्षशिस्त भंग करणाऱ्यांना माफी दिली जाणार नाही, असा इशाराही किशोर शितोळे यांनी दिला आहे.