भाजपने बिहारमधील प्रदेशाध्यक्ष बदलला; संजय सरावगी नवे अध्यक्ष, कोण आहेत ते जाणून घ्या…

पाटणा – बिहार भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत मोठा बदल करण्यात आला असून, पक्षाने दरभंगाचे आमदार संजय सरावगी यांची बिहार प्रदेशाध्यक्षपदी तातडीने नियुक्ती केली आहे. त्यांनी दिलीप जयस्वाल यांची जागा घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्राद्वारे ही औपचारिक घोषणा करण्यात आली असून, सरावगी यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.
या बदलामुळे भाजपच्या बिहार संघटनेत नितीन नवीन यांच्या कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीनंतरचा हा दुसरा मोठा फेरबदल आहे, ज्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप संघटनात्मक बळकटी आणि सामाजिक समीकरणांवर विशेष लक्ष देत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात.
भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री जेपी नड्डा ने श्री संजय सरावगी को बिहार भाजपा का अध्यक्ष नियुक्त किया। pic.twitter.com/ADgWxSsZMb
— BJP (@BJP4India) December 15, 2025
संजय सरावगी हे दरभंगा विधानसभा मतदारसंघातून सलग निवडून येणारे मजबूत आणि लोकप्रिय नेते मानले जातात. त्यांनी पहिल्यांदा 2005 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता आणि तेव्हापासून ते सतत विजयी होत आले आहेत. नुकत्याच झालेल्या 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवून स्वतःची मतदारसंघावरील पकड सिद्ध केली आहे.
संघटना आणि सरकार अशा दोन्ही स्तरांवर मजबूत पकड असलेल्या सरावगी यांना त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवामुळे आणि जमिनीवरील व्यापक जनसंपर्कामुळे ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सरावगी हे भाजपचा पारंपरिक समर्थक वर्ग मानल्या जाणाऱ्या वैश्य-मारवाडी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न –
भाजपने एका दिवसापूर्वीच बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन यांची कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर आता संजय सरावगी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवणे, हे भाजप आगामी राजकीय लढाईपूर्वी आपल्या संघटनेला अधिक धारदार आणि सामाजिक दृष्ट्या संतुलित करू पाहत असल्याचे दर्शवते. पक्षनेतृत्वाचा हा निर्णय बिहारमधील भाजपच्या धोरणात्मक तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.





