सरकारला ‘लाज कशी वाटत नाही’ महाआघाडीची प्रचारातील टॅगलाईन
मुुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात’च्या धर्तीवर कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी आता “जन की बात’ करणार आहे. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अल्पसंख्याक, विद्यार्थी, व्यापारी आदी घटकांना समोर ठेवत केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील अपयशाची कामगिरी जनतेसमोर मांडणार आहे. त्यासाठी प्रचार अभियानाच्या माध्यमातून पाच वर्षांतील आश्वासनांची पूर्तता न करता पुन्हा मते मागायला येताना सरकारला “लाज कशी वाटत नाही’ या टॅगलाईनच्या माध्यमातून महाआघाडी सरकारला जनतेच्या मनातील प्रश्नांचा जाब विचारणार आहे.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद आज गांधीभवन येथे पार पडली. कॉंग्रेस खासदार हुसेन दलवाई व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. लोकसभा निवडणूकीतील महाआघाडीची संयुक्त प्रचार यंत्रणेची आणि प्रचारातील मुद्द्यांची माहिती, ऑडीओ, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर कशापध्दतीने सरकारवर हल्लाबोल केला जाणार आहे याची माहिती सादरीकरणासह पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सरकारने मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले असून मोदीच्या चुकीच्या धोरणामुळे गरीब, शेतकरी, कष्टकरी, तरूण, विद्यार्थी, छोटे व्यापारी दलित अल्पसंख्यांक, आदिवासी असे सर्वच समाज घटक अडचणीत आले आहेत . मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मते मागायला येण्याच्या आधी मागच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ते अगोदर सांगा? अशी जनतेची भावना आहे.
सरकारने दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पाळले नाही, उलट तरूणांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला. नोकऱ्या मागणाऱ्यांना पकोडे तळायला सांगताना ‘लाज कशी वाटत नाही?’ मुली पळवून नेण्याची भाषा करणाऱ्यांना मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही? शाळा बंद करून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला पुन्हा मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही. पंधरा लाखाचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्यांना मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही? ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारणाऱ्या सरकारला मते मागताना लाज कशी वाटत नाही? हे जनतेच्या मनातील प्रश्न महाआघाडी सरकारला विचारणार आहे, असे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना शरद पवारांमुळे गुजरातचा विकास झाला हे सांगणारे मोदी आता निवडणुकाच्या तोंडावर पवारांवर टीका करत आहेत. पण राज्यातील जनतेला सत्यस्थिती माहित आहे. आमचा नेता हिटविकेट होणारा नाही तर क्लिनबोल्ड करणारा आहे, असा टोला नवाब मलिक यांनी मोदींना लगावला. तसेच मोदींनी सभा घेऊन काहीही फरक पडणार नसून गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा येथे भाजपचा पराभव करून महाआघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
…तर जनता तुमचीच चंपी करेल
बेताल वक्तव्ये करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेताना मलिक म्हणाले की, भाजीवाल्यांच्या मागे गजरे घेवून फिरणारे मंत्री चंपा (चंद्रकांत पाटील) यांनी चंपेगिरी सोडावी. त्यांच्यात हिम्मत असेल तर अजित पवार यांची चौकशी करुन दाखवावी. तुम्हाला कुणी अडवले आहे, नाही तर जनताच तुमची चंपी करेल असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.
“दगा नही देना, जमाना खराब है’
गुजरातमध्ये जाऊन मऊ-मऊ ढोकळा खाऊन आलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे “आज दगा नही देना’ हे सांगत आहेत. यावेळी “दगा नही देना, जमाना खराब है’ हे गाणं वाजवून सामनामध्ये आलेल्या मुलाखतीची खिल्ली नवाब मलिक यांनी उडवली. तसेच भाजप शिवसेनेत रडारडीचा डाव सुरु असून हो दोन्ही पक्ष एकमेकांना दगा देणार हे स्पष्ट आहे. जनतेशी दगाफटका करणाऱ्यांना जनता चांगलाच दणका देणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.