Pimpri : वडगाव नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू

वडगाव मावळ : नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शासनाने १७ प्रभागांची रचना जाहीर केल्यानंतर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रचार मोहिमांना सुरुवात केली आहे. मात्र ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होणार की महायुती व महाविकास आघाडीच्या पातळीवर लढवली जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
ही निवडणूक वडगाव नगरपंचायतीच्या स्थापनेनंतरची दुसरी सार्वत्रिक निवडणूक ठरणार आहे. बहुतेक प्रभाग मागीलप्रमाणेच असल्याने पूर्वीच्या निवडणुकीत विजयी झालेले नगरसेवक व इच्छुक उमेदवार पुन्हा आपली ताकद दाखविण्यास सज्ज झाले आहेत. तालुक्याचे महत्त्वाचे राजकीय केंद्र मानल्या जाणाऱ्या वडगाव मावळमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), मनसे, आरपीआय (आठवले गट), एसआरपी व बहुजन वंचित आघाडी या पक्षांचे तालुका व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे निवडणुकीत अनेक दिग्गज नेते व कार्यकर्त्यांचा सहभाग होणार हे निश्चित झाले आहे.
प्रभागांची रचना जाहीर झाली असली तरी आरक्षणाचा मुद्दा अजून प्रलंबित आहे. कोणत्या प्रभागाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी होणार, याची उत्सुकता वाढली आहे.
महायुती की स्वतंत्र लढत…
राज्यात महायुतीचे सरकार असून महाविकास आघाडी विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. राज्यातील पक्षश्रेष्ठींनी महायुतीच्या वतीने निवडणुका लढविण्याची संकेत दिली असले, तरी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. वडगाव नगरपंचायत निवडणुका महायुती- महाविकास आघाडीच्या पातळीवर होतील की प्रत्येक पक्ष स्वतंत्र उमेदवार उभा करेल, याबाबत अजूनही निश्चितता नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था आहे.
नगराध्यक्षपद थेट जनतेतून
या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. मात्र या पदाचे आरक्षण अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे शहरातील सर्वांचे लक्ष या घोषणेकडे लागले असून इच्छुकांनी नगराध्यक्षपदासाठीही तयारी सुरू केली आहे.





