श्रीनगर: जम्मू आणि काश्मिरमध्ये झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील एक जवान शहीद झाला. तर हारवान येथे संरक्षण दलांनी अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त केला. तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात आला. जम्मू काश्मिर पोलिसांना हरवान भागात अतिरेक्यांचा तळ असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिसांनी त्यावर हल्लाबोल केला. तेथे युध्दजन्य सामुग्रीचे भांडारच असल्याचे स्पष्ट झाले. तेथे जमीनीत भुसुरुंग, हातबॉम्ब, जीपीएस, एके मॅगेझिन्स जप्त करण्यात आली. दरम्यान पुलवामा जिल्ह्यात सकाळी आणखी एक चकमक उडाली. बांडोझ क्षेत्रात लपलेल्या अतिरेक्यांना शोधताना झालेल्या या चकमकीत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. यावेळी एक जवानही शहीद झाला. हा जवान सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या पानगाव भागातील आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या या जवानाचे नाव सुनील काळे असे आहे. काळे 2000मध्ये सेवेत रुजू झाले होते. काही काळापासून त्यांची नियुक्ती जम्मू काश्मिरमध्ये करण्यात आली होती. काळे यांच्या मृत्यूबाबत सोलापूर जिल्हा प्रसासनाने दुजोरा दिला आहे. काळे यांचे पार्थिव आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.