पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम एकाच टप्प्यात देण्यात यावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने केली आहे.
महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पिंपरी येथे बैठक झाली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र माने, उपाध्यक्ष दीपक काथवटे, सरचिटणीस ज्ञानेश्वर इंगावले, अंकुश कदम, वसंत वावरे, विजय कांबळे आदी उपस्थित होते.
जानेवारी 2016 पासून फरकाची थकबाकी रक्कम एकाच टप्प्यात रोख स्वरुपात येणाऱ्या मासिक वेतनात कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात यावी, अशा मागणीचा ठराव संमत करण्यात आला. फरकाची रक्कम एकाच टप्प्यात कर्मचाऱ्यांना दिल्यास त्याचा उपयोग आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्ज फेडण्यासाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी होणार आहे. यामुळे ही रक्कम एकाच टप्प्यात देण्याची मागणी संघटनेने केली आहे.