पुणे – मेक्सिको सरकारने दिलेला पुरस्कार हा देशाचा गौरव असल्याचे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले. पाटील यांना प्रतिष्ठेचा “ऑर्डन मेक्सिकाना डी ऍग्यूइला’ हा राष्ट्रीय पुरस्कार त्या देशाच्या भारतातील राजदूत मेल्बा प्रिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां.ब. मुजूमदार, डॉ. देविसिंह शेखावत, ज्योती राठोड, मोहन जोशी, उल्हास पवार, आमदार शरद रणपिसे, डॉ. शिवाजीराव कदम, चंद्रकांत शिवरकर, डॉ. के. एम. संचेती, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
“राष्ट्रपतीपदी असतांना मेक्सिको आणि भारत यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला. त्यावेळी मी देशाचे प्रतिनिधीत्व केले. हा पुरस्कार म्हणजे माझ्या देशाचा गौरव आहे. दोन्ही देशांच्या मैत्रीचा गौरव आहे,’ असे पाटील म्हणाल्या. यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. नेल्सन मंडेला, राणी एलिझाबेथ (द्वितीय), बिल गेट्स यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले’ असे यावेळी सांगण्यात आले.