राजगुरुनगर : भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना नवा न्यायमार्ग दाखवणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजगुरुनगर शहरात अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत श्रद्धा, शिस्त आणि शांततेत पार पडला. जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगतच्या एस. टी. स्थानकासमोर उभारलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास शासनामातर्फे उपविभागीय अधिकारी (प्रांत) अनिल दौंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार राम बीजे, रवींद्र मोरे उपस्थित होते. शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण, माजी सरपंच शांताराम घुमटकर, जी. आर. शिंदे, भीमशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव, भीमज्योत तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष सचिन अंकुश, नितीन गायकवाड, विशाल खंडागळे, प्रा. संदेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीचे अध्यक्ष अशोक कडलक, उपाध्यक्ष कैलास केदारी, सचिव विद्याधर साळवे, भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्र भोसले, निवृत्त मुख्याध्यापिका कांता कडलक, विलास रोकडे, पोलिस पाटील भिमराव थोरात, सुभाष शिंदे आदी मान्यवरांनीही पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यानंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांनी मेणबत्ती पेटवून, मौन पाळून बाबासाहेबांना विनम्र श्रद्धांजली वाहिली. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्रिसरण, पंचशील, पूजापाठ घेण्यात आला. शहरातील अनेक भीमसैनिक, महिला, युवक आणि नागरिकांनी सहभाग नोंदवून सामाजिक एकता, बंधुता आणि सामूहिकता यांचे दर्शन घडवले.