वाहन उद्योगाला मदतीची गरज

नवी दिल्ली :- या वर्षात आतापर्यंत वाहन विक्री 45 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. आगामी काळातही यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. या उद्योगाला तत्काळ मदतीची गरज असल्याचे सिआम या वाहन उद्योगाच्या संघटनेचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी सांगितले.
गेल्या नऊ महिन्यांपासून प्रवासी वाहन विक्रीत घट होत आहे. एप्रिल ते जून हा कालावधी वाया गेला आहे. 20 वर्षांत प्रथमच सलग नऊ महिने वाहन विक्री कमी झाली आहे. व्यावसायिक वाहनांची विक्रीही 15 महिन्यांपासून कमी होत आहे. अशा परिस्थितीत या उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी या उद्योगाला सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या 20 वर्षांत प्रथमच या उद्योगावर एवढा मोठा परिणाम करणाऱ्या घटना घडल्या आहेत. सरकारकडून नेमकी कशा मदतीची गरज आहे, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही एक महिन्यापासून वाहनावरील जीएसटी 10 टक्क्यांनी कमी करावा, अशी मागणी करीत आहोत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आगामी तिमाहीत वाहन कंपन्यांच्या ताळेबंदावर मोठा परिणाम होणार असल्याचे
त्यांनी सांगितले.





