Abhijit Dipke : “हल्ला करणारे लोक RSSचे होते”; जयपूरमधील घटनेनंतर अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Abhijit Dipke : 'गांधी-आंबेडकरांच्या मार्गावर चालणारे आम्ही लोक'

Abhijit Dipke : नीट परीक्षेतील कथित पेपर लीक आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून जयपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना काही जणांनी कानशिलात मारल्याची धक्कादायक घटना समोर आली.
याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. जयपूरमधील कथित हल्ल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने नागपुरात आंदोलनाची पुढील फेरी सुरू केली आहे.
नुकतेच अभिजीत दिपके (Abhijit Dipke) नागपूर विमानतळावर दाखल झाले. यावेळी माध्यमांसोबत बोलताना अभिजित दिपके यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) गंभीर आरोप केले.
“काल आमच्यावर हल्ला करणारे जे लोक समोर आले, ते संघाचेच होते. जे सरकारविरोधात बोलतात त्यांच्यावर असेच हल्ले होतात. यात काही नवीन नाही. मात्र संघभूमीत आलो तरी आमचे आंदोलन शांततापूर्ण मार्गानेच होईल,” असे दिपके यांनी नागपुरात उतरल्यावर स्पष्ट केले. Abhijit Dipke
आमच्यासाठी हल्ले नवीन नाही (Abhijit Dipke)
“आमच्यासाठी हल्ले नवे नाहीत. आमच्यावर कुणी कितीही अटॅक करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही हात उचलणार नाही. आम्ही सुरुवातीपासून सत्याग्रहाच्या मार्गाने चालत आलो आहोत आणि यापुढेही सत्याग्रहाच्या मार्गानेच आंदोलन करणार आहोत. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
गांधी-आंबेडकरांच्या मार्गावर चालणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हिंसेला हिंसेने उत्तर देणार नाही,” असे दिपके यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.
मात्र आता जयपूरमधील हल्ल्याच्या आरोपांनंतर नागपुरामध्ये सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले आहे. Abhijit Dipke
हेही वाचा :





