माजी केंद्रीय मंत्र्याशी संबंधित कंपनीची 315 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) खासदार वाय.एस.चौधरी यांच्याशी संबंधित कंपनीची तब्बल 315 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. बॅंकांची फसवणूक आणि मनी लॉण्डरिंगच्या आरोपांवरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ती कारवाई केली.

राज्यसभा सदस्य असणाऱ्या चौधरी यांच्याशी संबंधित कंपनीने सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, आंध्र बॅंक आणि कॉर्पोरेशन बॅंकेची फसवणूक केली. त्यामुळे त्या बॅंकांचे 364 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्याशिवाय, अनेक बनावट कंपन्या स्थापन करून मनी लॉण्डरिंग केल्याचाही कंपनीवर आरोप आहे. चौधरी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष एन.चंद्राबाबू नायडू यांचे निकटवर्तीय मानले जातात. टीडीपी केंद्रातील सत्तारूढ एनडीएमधून बाहेर पडण्याआधी मोदी सरकारमध्ये चौधरी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत होते. आता ऐन निवडणुकीच्या काळात चौधरी यांच्याशी संबंधित कंपनीची मालमत्ता जप्त झाल्याने आंध्रातील राजकीय वातावरण आणखीच तापण्याची शक्‍यता आहे. संबंधित प्रकरणात ईडीने याआधी हैदराबाद आणि दिल्लीत छापेही टाकले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.