Purandar : श्रीनाथ म्हस्कोबा चरणी कलावंतांची पहिली सेवा
Purandar : नवरात्रोत्सवात नऊ दिवस देऊळ वाड्यातील देवाचा छबिणा संपल्यावर दगडी कासवावर दिवसा व रात्री दोन वेळा हजेरीचा कार्यक्रम सुरू असतो. कला सादर करणाऱ्या नृत्यांगना तसेच कलाकारांना गावचे पाटील नेताजी बाबुराव धुमाळ यांच्या वतीने साडी चोळी व बिदागी देऊन सन्मानित करण्यात येते.

परिंचे : श्रीनाथ मस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त वीर (ता. पुरंदर) येथे तमाशा कलावंतांचे सहा ताफे दाखल झाले असून महाराष्ट्रातील विविध भागातून दोनशेहून अधिक तमाशा कलावंतांनी हजेरी लावली आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी देवाची सेवा करायला सुरुवात केली असून अनेक वर्षांपासून ही परंपरा आम्ही जपली असल्याचे, तमाशा कलावंत कविता कुडाळकर यांनी सांगितले. नवरात्रोत्सवात देवाची सेवा करून; आशीर्वाद घेऊन वर्षभर तमाशा, जागरण, गोंधळ, ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आपली कला सादर करत उपजीविका चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवरात्रोत्सवात नऊ दिवस देऊळ वाड्यातील देवाचा छबिणा संपल्यावर दगडी कासवावर दिवसा व रात्री दोन वेळा हजेरीचा कार्यक्रम सुरू असतो. कला सादर करणाऱ्या नृत्यांगना तसेच कलाकारांना गावचे पाटील नेताजी बाबुराव धुमाळ यांच्या वतीने साडी चोळी व बिदागी देऊन सन्मानित करण्यात येते. देवस्थान ट्रस्टच्या वतीने या कलावंतांना राहण्याची सोय, पिण्याचे पाणी तसेच शिधा वाटप करण्यात येत असल्याचे सारिका जावडेकर यांनी सांगितले. मंदिरात येणारे भाविक दर्शनाबरोबरच या कलावंतांच्या कलेला आर्थिक मदत करून दाद देतात.
वर्षाच्या सुरुवातीला नऊ दिवस वीर येथे मुक्काम करून देऊळ वाड्यातील दगडी कासवावर श्रीनाथांच्या चरणी आपली कला सादर करतात. वाई, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, तळेगाव, शिरवळ, लोणंद, उंब्रज, पुणे, सोलापूर या ठिकाणचे कलावंत हजेरी लावण्यासाठी आले आहेत. वडिलोपार्जित वारसा आम्हाला मिळाला असून ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे मीरा जावडेकर, कविता कुडाळकर यांनी सांगितले. यावेळी गीता पाटणकर, पल्लवी कुडाळकर, जयश्री जावडेकर आदी महिला कलाकार उपस्थित होत्या.
मुलांसाठी निवासी शाळा सुरू करा
काही ज्येष्ठ लोक कलावंतांना शासनाच्या वतीने मानधन तसेच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत असल्याने औषध तसेच कुटुंब चालवण्यासाठी मोठी मदत होत असल्याचे जयश्री जावडेकर यांनी सांगितले. तसेच कला सादर करण्यासाठी गावोगावी फिरावे लागते, अशा वेळी मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत असून तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे.
३३ व्या वर्षी दहावीची परीक्षा
कलेच्या माध्यमातून आम्हा कलाकारांना रोजगार मिळत आहे. पण या वर्षी महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट असल्याने याचा परिणाम कार्यक्रमांवर होणार असून त्यामुळे तमाशा कलावंतांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे कलावंत पल्लवी कुडाळकर यांनी सांगितले. लहानपणापासून शिक्षणाची आवड असून सुद्धा शिक्षण घेता आले नाही, आता वयाच्या ३३ व्या वर्षी मुक्त विद्यापीठातून दहावीची परीक्षा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.





