पिंपरी – शहरातील खासगी बसचाकांचा (ट्रॅव्हल्स) मनमानी कारभार थांबता थांबेना झाला आहे. वाहतूक पोलिसांची भिती न बाळगता नाशिक फाटा येथे पुणे-मुंबई व पुणे नाशिक महामार्गावर रस्त्याच्या कडेलाच बिनदिक्कतपणे ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यांच्या या मनमानी कारभाराबाबत वाहनधारकांमधून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा संपल्या आहेत. एप्रिल, मे महिन्यातील उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरातील अनेक जण खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेत आहेत. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग केलेल्या प्रवाशांना घेण्यासाठी नाशिक फाटा येथे खासगी ट्रॅव्हल्सच्या रांगा लागत आहेत. पिंपरी-चिंचवडहून पुण्याला जाताना नाशिक फाटा येथे डाव्या बाजूलाच मोठ्या ट्रॅव्हल्सची रांग लागत आहे. तसेच प्रवासी देखील कुटुंबासह उभे असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. त्याचा इतर वाहतुकीला अडथळा होत आहे. परिणामी ट्रॅव्हल्सधारक आणि इतर वाहनधारकांमध्ये वादाचे प्रसंग देखील उद्भवत आहेत. वाहतूक कोंडीत भर घालणाऱ्या या ट्रॅव्हल्सधारकांवर कारवाईची मागणी वाहनधारकांमधून होत आहे. वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष नाशिक फाट्यापासून थोड्या अंतरावर वाहतूक पोलीसांचे विभागाचे कार्यालय आहे. चौकात वाहतूक शाखेचे पोलीस देखील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी उभे असतात. मात्र, त्यांच्या समोरच खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी वाहतूक कोंडी निर्माण केली जात असताना हे वाहतूक पोलीस त्याकडे दूर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा धाकच नसल्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांचा कारभारही सुसाट चालू आहे. अपघाताची शक्यता नाशिक फाटा चौकात सायंकाळी 6 नंतर रात्री 10 पर्यंत वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. कामावरून घरी जाण्याची घाई सर्वांनाच असते. या ठिकाणी मोठे रस्ते असल्याने अनेकजण वेगाने वाहने चालवितात. या वेळी ट्रॅव्हल्स रस्त्यामध्येच असल्याने त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच भोसरीकडून पुण्याला जाताना डावीकडे वळण घ्यावे लागत आहे. अशा वेळी ट्रॅव्हल्स उभ्या असल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या शक्यता निर्माण होत आहेत.