प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेतील सत्तेपासून भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांकडून पुण्यातही एकत्र लढण्यासाठी महाविकास आघाडीची मोट बांधण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुण्यात एकत्र येण्याबाबत साकडे घालण्यात आल्याने आघाडीची मोट विस्कटली. त्यानंतर जोर-बैठका सुरू असताना आता अर्ज भरण्यासाठी उमेदवारांच्या हातात अघवे चार दिवस उरलेले असताना जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने उमेदवारी यादीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. तर, रविवारी (दि.२८) शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे उमेदवारांना आता अर्ज भरण्यासाठी शुक्रवार, शनिवार तसेच सोमवार आणि मंगळवार हे चारच दिवस असणार आहेत. त्यामुळे पक्षाने उमेदवारी (तिकीट) नाकारल्यास इतर पक्षात जाण्याचा अथवा अपक्ष उभा राहण्याचा निर्णयही अपक्ष उमेदवारांना घेता येत नसल्याने त्यांच्या जीवाची घालमेल सुरू आहे. चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच… महापालिका निवडणूकांची घोषणा आयोगाकडून १५ डिसेंबरला करण्यात आली. तर, २२ डिसेंबरपासून अर्ज विक्री तसेच अर्ज भरण्यास सुरूवात झाली. प्रत्यक्षात भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाकडून उमेदवारांना अर्ज देणे तसेच अर्ज स्विकारून मुलाखती झालेल्या नव्हत्या. त्यामुळे निवडणूका जाहीर झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे तसेच इतर राजकीय पक्षांकडून अर्ज वाटप तसेच मुलाखती सुरू करण्यात आल्या. त्याच वेळी तातडीने आघाडी करण्याबाबत निर्णय घेणे अपेक्षीत असताना पक्षांच्या मुलाखती झाल्यानंतर आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातच, मध्येच २० डिसेंबरला राज्यातील नगरपरिषदांचा निकाल जाहीर झाल्याने राज्यभरात मोठा फटका बसलेल्या राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीने (शरद पवार) एकत्र लढण्याचे संकेत दिले. त्यानंतर आघाडीत या दोन्ही पक्षांची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यावरून काँग्रेस नाराज झाली तर दुसरीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र येण्यासही विलंब झाला आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी चार दिवस राहिले असले तरी भाजप वगळता या सर्वच पक्षांना अद्याप आपल्या जागाच निश्चित करता आलेल्या नाहीत. आता, रविवारी अर्ज भरता येणार नसल्याने या पक्षांना कोणत्याही स्थितीत रविवारी आपल्या याद्या जाहीर कराव्या लागणार आहेत तसेच आघाडीच्या जागा वाटपाची चर्चाही संपवावी लागणार आहे.