Police Recruitment: केवळ बारावी उत्तीर्ण ही किमान अट असतानाही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या शिपाई भरतीकडे उच्चशिक्षित तरुणांनी मोठ्या प्रमाणावर धाव घेतली आहे. ४६२ जागांसाठी तब्बल १४ हजार ७७९ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ५,४२३ उमेदवार पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहेत. वाढती स्पर्धा, सरकारी सुरक्षित नोकरीची हमी आणि खाकी वर्दीचे आकर्षण या तिन्ही कारणांमुळे उच्चशिक्षितांचा कल पोलीस दलाकडे वळल्याचे चित्र आहे. या भरती प्रक्रियेत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसह तांत्रिक क्षेत्रातील उमेदवारांची उपस्थिती लक्षणीय आहे. कला शाखेतील २,४३६, विज्ञान शाखेतील १,००७ आणि वाणिज्य शाखेतील ९६५ उमेदवार मैदानात उतरले आहेत. याशिवाय १५२ अभियांत्रिकी पदवीधर, ४० फार्मेसी, ५९ एमबीए, १०७ बीसीए तसेच एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम.टेक., एमसीए, एमई पदवीधरही स्पर्धेत आहेत. या आकडेवारीवरून पोलीस दलातील नोकरीचे वाढते आकर्षण आणि रोजगार बाजारातील आव्हाने दोन्ही बाबी स्पष्ट होत आहेत. अशी होते भरतीची प्रक्रिया भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात ११ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू आहे. पहाटे चार वाजल्यापासून उमेदवारांची गर्दी होत आहे. प्रवेशद्वारावर बारकोड स्कॅनरद्वारे नोंदणी, त्यानंतर उंची व छातीचे मोजमाप, कागदपत्रांची तपासणी आणि पात्र उमेदवारांना आरएफआयडी टॅग व चेस्ट क्रमांक देण्यात येतो. पुढे १०० मीटर धावणे, गोळाफेक आणि १६०० मीटर धावणे अशा शारीरिक चाचण्या घेतल्या जात आहेत. महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, १०० मीटर आणि गोळाफेक यांचा समावेश आहे. कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास उमेदवाराला पुढील फेरीतून बाद केले जाते. उच्चशिक्षित उमेदवार दलात दाखल झाल्यास तांत्रिक ज्ञान, प्रशासकीय समज आणि कार्यक्षमतेत भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ‘भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. खाकी वर्दीची प्रतिष्ठा आणि स्थिर नोकरीची हमी यामुळेच उच्चशिक्षित तरुणांमध्ये पोलीस दलात सेवा देण्याची चढाओढ निर्माण झाल्याचे या भरतीतून स्पष्ट झाले आहे.’- सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त. Pimpri Chinchwad : माझी वसुंधरा अभियानात पिंपरी चिंचवड प्रथम