मुंबई – क्रिकेट, कबड्डी आणि बॅडमिंटन या खेळांप्रमाणे आता खो-खो या खेळाची देखील व्यावसायिक लीग आता सुरू करण्यात येणार आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात खो-खो खेळाची पहिली लीग खेळवली जाणार आहे. अखिल भारतीय खो-खो महासंघातर्फे मंगळवारी “अल्टिमेट खो-खो’ लीगचे अधिकृतपणे अनावरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी एका चित्रफितीद्वारे या लीगची घोषणा केली.
“आयपीएल’सारखेच खो-खो लीगचे स्वरूप राहणार असून 21 दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक, स्वरूप व तारखा अद्याप ठरल्या नसल्या तरी मुंबई, दिल्ली व पुणे अशा तीन ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या मध्ये आठ संघांमध्ये एकूण 60 सामने रंगणार असून भारता व्यतिरिक्त इंग्लंड, दक्षिण कोरिया, इराण, बांगलादेश, नेपाळ व श्रीलंका या देशांमधून खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्याशिवाय 18 वर्षांखालील खेळाडूंनाही या स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.
असे असेल खो-खो लीगचे संभाव्य स्वरूप
-नऊ मिनिटांच्या चार डावांऐवजी प्रत्येकी सात मिनिटांचे तीन डाव
-प्रत्येक संघात एकूण 12 (नऊ खेळाडू, 3 राखीव) खेळाडूंचा सहभाग
-सर्व संरक्षकांना संरक्षण करण्याची संधी
-संघात दोन “वजीर’ असतील जे आक्रमण करताना चौथ्या क्रमांकावर बसले तर त्यांना कोणत्याही दिशेने धावण्याचे स्वातंत्र्य
-खेळाडूंची लिलाव प्रक्रियेद्वारे निवड
-पहिल्या डावात सुरुवातीला बाद झालेल्या खेळाडूंऐवजी उर्वरित खेळाडूंना दुसऱ्या डावात संरक्षण करण्याची संधी
-पंच समीक्षा प्रणालीचाही (रेफरल) प्रत्येक डावात एकदा अवलंब करण्याची मुभा
-प्रत्येक संघात भारताचे किमान पाच आणि परदेशातील दोन खेळाडू असणे बंधनकारक