Satara | प्राथमिक शिक्षक बॅंकेचा कारभार प्रेरणादायी

सातारा (प्रतिनिधी) – अडचणीच्या काळातही पगारदार नोकरांची अग्रणी बॅंक असलेल्या प्राथमिक शिक्षक बॅंक शतक महोत्सवी समारंभ साजरा करत आहे ही बाब निश्चितच लक्ष वेधून घेणारी आहे. शिक्षक बॅंक करत असलेले कार्य अन्य बॅंकासाठी निश्चितच प्रेरणादायी असा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असणाऱ्या प्राथमिक शिक्षक बॅंकेचा शतक महोत्सवी समारंभ जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खा. पवार बोलत होते.
यावेळी खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. जयंत आसगावकर, शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, बॅंकेचे चेअरमन किरण यादव, व्हा. चेअरमन शहाजी खाडे, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजयराव कोंबे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख,
समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, अखिल शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस दीपक भुजबळ, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, अखिल सातारा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, सातारा जिल्हा नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अनिल देसाई, अभय जगताप, डॉ. अरुणा बर्गे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक आदी उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले, सातारची प्राथमिक शिक्षक बॅंक कर्ज वितरण, कर्ज वसुली यामध्ये बॅंक अग्रेसर आहे. शिक्षकांची आधारवड बनत सभासदांच्या पाल्यांनाही शिक्षणासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देवून बॅंकेने भावी पिढी घडवण्याचेच काम केले आहे.
आगामी काळातील संकटे ओळखून बॅंक कारभार करत आहे याचा निश्चित आनंद आहे. बॅंकेने आणखी सभासदाभिमुख उपक्रम राबवावेत असे आवाहन त्यांनी केले.
खा. धैर्यशील मोहिते – पाटील म्हणाले, सहकारात दिवसेंदिवस अडचणी वाढत असतानाही पगारदार नोकरांच्या बॅंकेत शिक्षक बॅंक अग्रणी असून बॅंकेचा शतकी महोत्सव साजरा होणे ही बाबही निश्चितच समाधानकारक आहे.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, आज शिक्षकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सध्या शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावून वेठीस धरण्याचे काम होत आहे. महाविकास आघाडी सरकार कार्यरत असताना काही प्रश्न आम्ही मार्गी लावले आहेत. सध्याच्या सरकारने मात्र, शिक्षकांचा फक्त मतासाठी वापर केला आहे.
संभाजीराव थोरात म्हणाले, केंद्रातील सहकार खात्याने अध्यादेश काढून सेवानिवृत्तांचा सभासद होण्याचा अधिकार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जे सेवानिवृत्त सभासद आहेत त्यांची कर्ज वसुली होण्यात अडचणी येणार आहेत.
उदय शिंदे म्हणाले, २००५ नंतर नोकरीत लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, २० पटाच्या आतील शाळा बंद करु नयेत, शिक्षण सेवक पद रद्द करावे आदी मागण्या यावेळी त्यांनी केल्या.
किरण यादव म्हणाले, दि. २१ ऑक्टोबर १९२४ रोजी स्थापन झालेली प्राथमिक शिक्षक बँक १०० वर्षे पूर्ण करत असल्याचा निश्चितच अभिमान आहे. बॅंकेच्या नावलाैकिकासाठी अनेकांनी दिलेले योगदान न विसरणारे आहे.
पगारदार नोकरांच्या बॅंकेत ही बॅंक अग्रणी असून बॅंकेने नेहमीच सभासदाभिमुख कार्यभार केला आहे. बॅंकेने सभासदाभिमुख व पारदर्शक कारभार केल्याने राज्यात नावलाैकिक मिळवला आहे. आज गुगल पे व फोन पे चा शुभारंभ होत असल्याचे समाधान आहे.
चोख कारभारासाठी महिलांना संधी द्या – शरद पवार
प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या तीन कार्यक्रमांना मला उपस्थित राहता आल्याचा मला निश्चितच आनंद आहे. कृ. बा. बाबर यांनी सुरु केलेल्या बॅंकेचे आज खूप मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झाले आहे. त्यांच्या कन्या सरोजिनी बाबर व आम्ही विधानमंडळात एकत्र काम केले आहे.
प्राथमिक शिक्षक बॅंकेने दोन महिलांना संचालक पदाची संधी दिल्याचे निश्चितच समाधान आहे. ही संधी उपलब्ध करुन देण्यात आमचाच वाटा आहे. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांनीच घेतलेला नसून सर्वांना संधी देण्याची गरज आहे.
महिलांना सहभागी करुन घेतल्यास आणखी चोख व्यवहार होइल. शिक्षक बॅंकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक राहिल्यानेच बॅंकेचा राज्यभर नावलाैकिक असून शिक्षकांचा खऱ्या अर्थाने आधारवड बनण्याचे काम बॅंकेने केले असल्याचे गौरवोद्गार खा. शरद पवार यांनी काढले.





