चंद्राबाबूंवरील कारवाई अवैध ! तेलगू देसम पक्षाचे मुर्मू, मोदी, शहांना साकडे

नवी दिल्ली – तेलगू देसमचे प्रमुख एन.चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्याची कारवाई अवैध असल्याची भूमिका त्या पक्षाने घेतली आहे. तसेच, संबंधित प्रकरणी हस्तक्षेप करण्याचे साकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घातले आहे.
तेलगू देसमच्या विविध नेत्यांनी मुर्मू, मोदी आणि शहांना पत्रं पाठवून चंद्राबाबूंच्या अटकेविषयी संशय आणि चिंता व्यक्त केली आहे.आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या चंद्राबाबूंची 45 वर्षांची राजकीय कारकीर्द अतिशय स्वच्छ आहे. त्यांना लोकशाहीशी विसंगत असणाऱ्या पद्धतीने अवैधरित्या अटक करण्यात आली.
त्या प्रक्रियेची वैधता आणि प्रामाणिकपणा याविषयी साशंकता वाटते. त्यामुळे संबंधित प्रक्रियेचा पारदर्शक आणि सखोल तपास व्हावा, अशी मागणी पत्रांमध्ये करण्यात आली आहे.
अटकेच्या टायमिंगविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. चंद्राबाबूंना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, आंध्रचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी सध्या लंडनमध्ये असल्याचे समजते. ते परदेश दौऱ्यावर असताना चंद्राबाबूंवर कारवाई झाली आहे.





