श्रीगोंदा -पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात पोलिसांना गुंगारा देऊन फरार असणारा मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते याने आज अखेर श्रीगोंदा पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मूळचे थिटे सांगवी येथील असणारे देवकाते हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या बाहेर असलेल्या संबंधाला पत्नी विरोध करते म्हणून पत्नीचा ते छळ करत होते. त्या छळाला कंटाळून त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सदर घटनेबाबत मयत मुलीच्या घरच्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला देवकाते याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून देवकाते याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, हुंडाबळी, कौटुंबिक छळ असे विविध कलमाखाली गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी देवकाते फरार होता. अ.नगर पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस पथके या आरोपीचा शोध घेत होते. सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित, सहायक पो नि कांबळे यांचे पोलीस पथक देवकाते यांच्या मागावर होते. परंतु स्वतः पोलीस अधिकारी असल्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागत नव्हता. परंतु आज अखेर देवकाते याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. याच गुन्ह्यात आरोपी असलेले देवकाते याचे भाऊ व वडील यांना दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत.