आजपासून शैक्षणिक सत्र सुरु

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, आहाराचे वाटप

पिंपरी – करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यास काही कालावधी लागणार आहे. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये सोमवार (दि. 15) पासून ऑनलाइन अभ्यासक्रमाद्वारे शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. तसेच आजपासूनच “सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक तसेच पोषण आहाराचे वाटप करण्यात येणार आहे.

करोनामुळे शाळा, महाविद्यालये केव्हा सुरू होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरातील खासगी शाळांनी मात्र शाळा कधी सुरू होणार याची वाट न पहता विद्यार्थ्यांना नवीन वर्षाचा ऑनलाइन अभ्यासक्रम देण्यास सुरुवात केली आहे. खासगी शाळा तसेच खासगी कोचिंग क्‍लास यांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग भरवून त्यांना गृहपाठ देण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमात आता महापालिकेच्या शाळाही मागे राहिलेल्या नाहीत. महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनाही आता ऑनलाइन अभ्यासक्रम दिला जाणार आहे. त्याची तयारीही सुरू झाली आहे.

आजपासून प्रत्यक्ष शाळांना सुरुवात होणार नसली तरी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र मात्र सुरू होणार आहे. हे सत्र सुरू होण्याआगोदर संपूर्ण शाळा तसेच वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करून शालेय परिसराची स्वच्छ करण्यात आला आहे. आजपासून विद्यार्थ्यांना नियमांचे पालन करत पाठ्यपुस्तके व पोषण आहाराचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मागील शैक्षणिक वर्षाचा निकालही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यापूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या व्हॉट्‌सऍपवर निकालाचे वितरण करण्यात आले होते. मात्र आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निकालपत्रक देण्यात येईल.

या दरम्यान विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची जबादारी शाळेच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार सध्या मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना कोणत्या वेळेत बोलवायचे याचे नियोजन करण्यात येत आहे. याकामी महिला बचतगट सदस्य, शाळा व्यवस्थापन सदस्य, माजी विद्यार्थी तसेच स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत पाठ्यपुस्तक तसेच पोषण आहाराचे वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन धडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे, आजपासून प्रत्यक्ष शाळेची घंटा वाजणार नसली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष मात्र सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘त्या’ शिक्षकांना मिळणार सूट
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याबरोबरच गृहपाठ तसेच इतर माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आजपासून महापालिका शाळेतील शिक्षकांना दररोज शाळेत जावे लागणार आहे. मात्र, ज्या शिक्षकांना करोनाशी संबंधित कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या शिक्षकांना शाळेत बोलवले जाणार नसल्याची माहिती पराग मुंडे यांनी दिली आहे.

ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी घेतली जाणार स्वयंसेवकांची मदत
वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम कसा घ्यावा यासाठी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची व स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. त्या मदतीने या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्व माध्यमाचे ई-साहित्य तयार केले असून, कम्युनिटी रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क, दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे.

आजपासून शाळेला सुरुवात होणार नसली तरी शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व पोषण आहाराचे वितरण करण्यासाठी शाळेत बोलविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे.
– पराग मुंडे, शिक्षण अधिकारी माध्यमिक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.