पुणे/कात्रज – मार्च ते जून या चार महिन्यांचे 200 युनिट वीजबिल माफीची घोषणा सरकारने करावी, वीज दरवाढ मागे घ्यावी, अधिभार आणि वहन कर रद्द करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आम आदमी पार्टीने पद्मावती महावितरण कार्यालया समोर संयोजक मुकुंद किर्दत आणि सहसंयोजक संदीप सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोको आंदोलन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदर मागण्यांबाबत आम आदमी पार्टीकडून निवेदन देण्यात आले होते. तसेच, क्रांतिदिनी पालकमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्यात आला होता. तर, राज्यभरात कार्यकर्त्यांनी जेल भरो केले; परंतु याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नाही. आता, पावसाळी अधिवेशनात तरी विजेसंदर्भातील प्रश्नांवर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीकडून करण्यात आली आहे. जनतेची लूट बंद करावी, 300 युनिट वीज वापर करणाऱ्यांना 30% स्वस्त वीज द्यावी, आदी मागण्या आम पार्टीने लावून धरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पद्मावती वीज कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.