ठाणे : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पार्टीने (आप) भिवंडी आणि नवी मुंबई येथे निवडणुक लडवण्याची घोषणा केली असून, दोन्ही महापालिकांमध्ये जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उभे करण्याची योजना जाहीर केली आहे. पक्षाने भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या ९० पैकी ३० जागांसाठी उमेदवारांची प्राथमिक छाननी पूर्ण केली असल्याची माहीती आपच्या भिवंडी युनिटचे अध्यक्ष मसिह इक्बाल आणि सरचिटणीस हनुमंत जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पक्ष सुशिक्षित, सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे आणि स्थानिक समस्यांची सखोल जाण असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, तर उर्वरित जागांसाठी स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई युनिटचे प्रमुख दिनेश ठाकूर यांनी माहीती दिली की, आप नवी मुंबईत पहिल्यांदाच महापालिका निवडणूक लढवणार असून, १११ जागांवर उमेदवार उभे करण्याची योजना आहे. ठाणे शहरात, आप महानगरपालिकेच्या १३१ पैकी १०० जागांवर उमेदवार उभे करण्याचा मानस आहे. इच्छुकांकडून ४० हून अधिक अर्ज आधीच प्राप्त झाले आहेत, असे ठाणे युनिटचे अध्यक्ष अमर आमटे यांनी सांगितले. पक्ष आपल्या प्रचारात खराब रस्त्यांची स्थिती, अपुऱ्या आरोग्य सुविधा, पाण्याची टंचाई, स्वच्छतेच्या समस्या आणि महापालिका प्रशासनातील कथित भ्रष्टाचार यासह नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. पक्षाचे ध्येय दिल्ली आणि पंजाबमध्ये लागू केलेल्या धर्तीवर पारदर्शकता आणि लोककल्याणावर आधारित प्रशासकीय मॉडेल लागू करणे असल्याचे ते म्हणाले. आप स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशाप्रमाणे आम आदमी पार्टी महाराष्ट्र मधील पालीका निवडणुका या कुणाशीही युती न करता, स्वतंत्रपणे स्वबळावर आणि सक्षमपणे लढवणार आहे, असे आपचे राज्य कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी स्पष्ट केले आहे. युती/आघाडी संदर्भात माध्यमांमध्ये येत असणाऱ्या बातम्या या दिशाभूल करणाऱ्या आहेत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.