९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार; तब्बल ३२ वर्षांनी मिळाला मान, पुण्याच्या बैठकीत एकमताने निर्णय

सातारा: ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सातारा शहरामध्ये होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने पुणे येथील बैठकीत हा निर्णय आज जाहीर केला.
पूर्वी १९९३ मध्ये ६६ वेळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे झाले होते. तत्कालीन मंत्री कै. अभयसिंहराजे भोसले त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. तर कै. विद्याधर गोखले संमेलनाध्यक्ष होते. त्यानंतर विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली ९९ व्या संमेलनाचा मान साताराला मिळाला आहे.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या पुढाकाराने मराठी साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने या संमेलनासाठी महामंडळाकडे निमंत्रण दिले होते. त्यानुसार निवड समितीने काल सातारा येथे येऊन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, विनोद कुलकर्णी व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. साताऱ्याबरोबरच कोल्हापूर, इचलकरंजी, औदुंबर येथूनही निमंत्रण आले होते. अखेर आज साताऱ्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.





