#IPL2022 | आयपीएलचे 5 वर्षांचे हक्क विकले जाणार विक्रमी किंमतीत

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या आगामी पाच वर्षाच्या प्रक्षेपण हक्कांसाठी इंग्लंडमधील स्काय स्पोर्टस व दक्षिण आफ्रिकेतील सुपर स्पोर्टस या दोन माध्यम समुहांमध्ये रस्सीखेच होणार आहे. अर्थात हे हक्क कोणत्याही समुहाने खरेदी केली तरी लाभ बीसीसीआयलाच होणार असून त्यांना या हक्कांच्या विक्रीतून तब्बल 50 हजार कोटी रूपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
बीसीसीआयने या हक्कांच्या आमंत्रण निविदा काढल्या असून आंतरराष्ट्रीय प्रक्षेपण हक्कांसाठी या दोन समुहाकडून कीती बोली लावली जाइल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. स्काय स्पोर्टस व सुपर स्पोर्टसने या आमंत्रण निविदा घेतल्या असून आता त्यांना या सर्व प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी काही वेळ दिला गेला असून त्यासाठी या दोन्ही समुहांनी बीसीसीआयकडे 25 लाख रुपये अनामत रक्कमही भरली आहे.
आयपीएलची ब्रॅंड व्हॅल्यू मोठी असल्यामुळे या कंपन्या बिडिंग प्रक्रियेतही उतरण्याची शक्यता वर्तवली जात असून यापूर्वी व्हायकॉम 18, झी एन्टरटेन्मेंट, सोनी, ड्रीम 11, स्टार यांनी भारतातील प्रसारण हक्कांसाठी याआधीच आयपीएलच्या आमंत्रण निविदा घेतल्या आहेत.
त्यामुळे यंदा या हक्कांसाठी मोठी चुरस रंगण्याची शक्यता आहे. या हक्कांची बेस प्राईस जवळपास 32 हजार कोटी ठेवण्यात आली असून यंदाच्या वाटप प्रक्रियेत बोली लागून जवळपास 50 हजार कोटी रुपये बीसीसीआयला मिळतील असा अंदाजही वर्तवला जात आहे.





