Satara: विठ्ठलाची ३७ फूट उंच मूर्ती ठरतेय आकर्षण
Satara 'अभिकुडाळ - पाचगणी रस्त्यावरील ‘अभिनव ॲग्रो फार्म’ याठिकाणी ही मूर्ती उभारण्यात आली असून आषाढी एकादशीनिमित्त येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Satara: आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर कुडाळ- पाचगणी रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्ह्यातील सर्वात उंच ३७ फूटी विठ्ठलाची भव्य मूर्ती सध्या संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
‘अभिकुडाळ – पाचगणी रस्त्यावरील ‘अभिनव ॲग्रो फार्म’ याठिकाणी ही मूर्ती उभारण्यात आली असून आषाढी एकादशीनिमित्त येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात आषाढी एकादशी दिवशी सकाळी ८ वाजता जावळी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते ३७ फूटी विठ्ठल मूर्तीवर पार पडणाऱ्या दुग्धाभिषेकाने होणार आहे. या प्रसंगी परिसरातील भाविकांसह बामणोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ढोल- लेझिम पथकाच्या गजरात विठूरायाला शानदार सलामी देण्यात येणार आहे. यानिमित्ताने दिवसभर कार्यक्रमांची मांदियाळी होणार आहे.
दुपारी १२ वाजता परिसरातील विविध गावांमधील दिंड्यांचे आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या दिंड्यांचे आगमन होणार आहे. याच वेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विशेष पथनाट्यांचे सादरीकरणही केले जाईल. दुपारी २ ते ४ या वेळेत प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि त्यांचे शिष्य गौतम हराळ यांच्या सुरांनी नटलेला भक्तिसंगीताचा विशेष कार्यक्रम रंगणार आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वीरेंद्र केंजळे यांचा ‘साज’ हा भक्तिसंगीताचा सुरेल कार्यक्रम होणार आहे. विठूरायाच्या दर्शनासोबतच या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक दत्ताशेठ भालेघरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.





